Madhuri Dixit (Photo Credit: Wiki)

Madhuri Dixit Political News: अभिनेत्री माधूरी दीक्षीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा (Madhuri Dixit Likely to Join BJP) राजकीय वर्तुळ आणि प्रसारमाध्यमांतून सुरु आहे. या वृत्त आणि चर्चेला पक्ष अथवा अभिनेत्रीकडून कोणताही दुजोरा मिळाला नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणूक 2024 जिंकण्याचे मोठे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप समोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटी आणि सातत्याने चर्चेत असलेल्या चेहऱ्यांवर भाजपचा डोळा आहे. या चेहऱ्यांना भाजपमध्ये घेऊन थेट निवडणुकीच्या मैदानात उतरवायचा विचार पक्षनेतृत्वाच्या मनात असल्याची चर्चा खुद्द भाजप कार्यकर्त्यांमध्येही आहे. उघडपणे मात्र यावर कोणीही बोलताना दिसत नाही.

 भाजपकडून वृत्ताचे खंडण 

अभिनेत्रीच्या पक्ष प्रवेशाची आणि उमेदवारीची चर्चा सुरु होताच भाजपकडून या वृत्ताचे खंडण केले जात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मात्र, माधुरी दीक्षीत हिच्या भाजप प्रवेशाची पाठिमागील प्रदीर्घ काळापासून जोरदार चर्चा आहे. केवळ माधुरीच नव्हे तर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनाही भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता पाठिमागील महिन्यापासून वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात विविध चर्चा उलटसुलट पद्धतीने सुरु असतात. त्या विविध कारणांनी होत असल्या तरी त्यात अजिबातच तथ्य नसते असे होत नाही. पाठिमागील काही वर्षांचा इतिहास पाहता राजकीय पक्षांना सेलिब्रेटी मंडळींचे वावडे नसल्याच पाहायला मिळते. आजही लोकसभेमध्ये परेश रावल, सनी देओल, मनोज तिवारी, रवी किशन, गौतम गंभीर यांसारख्या चेहऱ्यांना भाजपने लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरवले होते. हे चेहरे भाजप तिकीटावर निवडूनही आले होते. जे आज लोकसभेत दिसतात. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवेसेना आदी पक्षांनीही अनेकदा अभिनेते, खेळाडू, पत्रकारांवर राजकीय डाव लावले आहेत.

भाजपचे महत्त्वाचे चेहरे मैदानात

सांगितले जात आहे की, माधुरी दीक्षीत यांना मुंबईतील एखाद्या लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले जाऊ शकते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप अनेक महत्त्वाच्या चेहऱ्यांना मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. यात काही भाजपचे जुने चेहरे असतील तर काही नवे चेहेरेही पायाला मिळू शकतात.

पूनम महाजन यांचा पत्ता कट?

राजकीय विश्लेषकांचा दावा आहे की, बदलत्या राजकीय परिस्थितीत विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी माधुरी किंवा विनोद तावडे यांना भाजपची उमेदवारी मिळू शकते. मुंबईतील काही जागांवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जागा वाटपावेळी लोकसभा मतदारसंघांची आदलाबदल केली जाऊ शकते. तसे घडले तर स्थानिक राजकीय समिकरणे बदलतील. त्यामुळे सहाजिकच उमेदवारही बदलले जाऊन नवे चेहरे पुढे आणले जातील, अशी शक्यता आहे.