शिर्डी साईबाबा मंदिर ( Photo Credit: Wikimedia Commons )

अनधिकृत भोंगे उतरवण्याच्या मागणीवरून सध्या महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. मनसे या विषयी आक्रमक आहे. भोंगे हा धार्मिक नसून सामाजिक विषय असल्याने केवळ मशिदी नव्हे तर मंदिरांवरील भोंगे देखील उतरवा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असल्याने त्याची अंमलबजावणी आज शिर्डीच्या साई मंदिरातही (Shirdi Sai Mandir) झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच पहाटेची काकड आरती आणि रात्रीची शेजारती लाऊडस्पिकरविना झाली आहे. शिर्डीच्या साई मंदिरासोबतच या भागात असलेल्या मशिदींनीही भोंग्यांशिवाय अजान दिली आहे.

शिर्डीच्या साई मंदिरामध्ये सर्वधर्मीय दर्शनाला येतात. या मंदिरात हिंदु-मुस्लिमांचे ऐक्य देखील जपलं जातं. शिर्डीत साईबाबा वास्तव्याला असताना पडक्या मशिदीत त्यांनी धुनी प्रज्वलीत केल्या होत्या. साईबाबा असताना या मशिदीला द्वारकामाई म्हटलं जात होतं. आजही द्वारकामाईवर रामनवमीच्या दिवशी भगवा आणि हिरवा रंग असलेला हिंदू-मुस्लीमांच्या एकतेचा ध्वज फडकवण्याची प्रथा आहे. हे देखील नक्की वाचा: Loudspeaker Row In Maharashtra: मनसे कडून 'भोंगे हटवा' डिजिटल स्वाक्षरी मोहिम जाहीर; सजग नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन .

साईमंदिरात आजही नियमित सकाळी 9:45 वाजता साईच्या समाधी समोर हिंदू आणि मुस्लीम मानकरी एकत्र येतात आणि चादर चढवतात. साई समाधीच्या उत्तरेकडील बाजुने मुस्लीम तर दक्षिणेकडील बाजुने हिंदू मानकरी उभे राहुन फुले वाहण्याची जुनी परंपरा आहे.

साई मंदिरात वेळापत्रकानुसार पहाटे 5 वाजता भूपाळी नंतर काकड आरती होते. रात्री 10 वाजता शेजारती होते. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार सकाळी 6 पूर्वी आणि रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी असल्याने मंदिर प्रशासनाने या दोन्ही आरत्या लाऊडस्पीकर वर बंद केल्या आहेत.

दरम्यान लोकमत 18 च्या रिपोर्टनुसार शिर्डीच्या ग्रामस्थांकाडून मंजुळ आवाजात सुरू असलेल्या आरत्या कायम ठेवण्याबाबत विचार करावा अशी मागणी केली आहे. नियमावलीनुसार लाऊडस्पीकर वरून आता केवळ शेजारती आणि काकडआरतीचा अपवाद असेल बाकी आरत्या लाऊड स्पीकर वर सुरू राहणार आहेत. मात्र त्यांना डेसिबलचं बंधन असणार आहे.