कॉंग्रेस पक्षाकडून आज आगामी लोकसभा निवडणूकांच्या (Loksabha Election) दृष्टीने महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस प्रदेश पक्षाची कोअर ग्रुपची बैठक झाली. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माढ्यातील (Madha) कार्यकर्त्यांना कामाला लागा, असा आदेश दिला आहे. पण हा माढा लोकसभा संघ एनसीपी कडे असल्याने यावरून येत्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता आहे.
2009 पासून 3 वेळेस एनसीपी माढा लोकसभा मतदारसंघातून लढली आहे. पण आता माढाचा पुढचा खासदार कॉंग्रेसचा असेल असा दावा थेट पृथ्वीराज चव्हाणांनी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये माण, खटाव आणि फलटण या विधानसभा मतदारसंघात झालेल्या बैठकींच्या आयोजनांमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा साठी तयारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या परिणाम मविआ वर होण्याची शक्यता आहे.
2008 मध्ये माढा मतदार संघ बनला आहे. यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. करमाळा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण, माढा या विधानसभा संघांचा त्यामध्ये समावेश आहे. कॉंग्रेसच्या बैठकी मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, सातारा जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, सोलापूर जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह देशमुख, सुरेश चव्हाण, श्रीरंग चव्हाण, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, भानुदास माळी, अल्पना यादव यांचा समावेश होता.
2009 मध्ये शरद पवार याच माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि 2019 मध्ये भाजप चे रणजीतसिंह नाईक निंबळकर जिंकले आहेत.
मागील 70 वर्षामध्ये जेवढे कर्ज नव्हते, तेवढे कर्ज मोदी सरकारने आता काढले आहे. त्यामुळे भारताचा प्रवास आता आर्थिक संकटाकडे सुरू झाला आहे. संविधान वाचेल की नाही सांगता येणार नाही. भाजपला मतदान करून देशाचे आणि स्वतःचे नुकसान करून घेऊ नका, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.