आज महाराष्ट्रात 11 जागांवर लोकसभेसाठी तिसर्या टप्प्यात मतदान होणार आहे. देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण 93 जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, बारामती, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, माढा , लातूर,धाराशिव, हातकंणगले, रायगडमध्ये मतदान होत आहे. शिवसेना, एनसीपी मध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडी, महायुती निवडणूकीच्या रिंगणामध्ये उतरली आहे त्यामुळे मागे महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर निवडणूकीचा निकाल 4 जून दिवशी लागणार आहे. आजच्या निवडणूकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले, शाहू महाराज छत्रपती तर बारामती मध्ये सुनेत्रा सुळे विरूद्ध सुप्रिया सुळे ही प्रतिष्ठेची लढत आहे. आज त्यांचं राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये कैद होणार आहे.
आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गुजरात मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच 'आजच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन करतो. त्यांच्या सक्रीय सहभागामुळे निवडणूका अधिक चैतन्यमयी होतील.' असं ट्वीट त्यांनी केले आहे. सध्या अनेक ठिकाणी असलेला उन्हाचा कडाका, सुट्ट्यांचा काळ यामुळे मतदानाकडे पाठ फिरवली जाते पण लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केले जात आहे.