Congress, BJP | (File Image)

भाजपाचे  चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची उमेदवारी रद्द करा अशी तक्रार कॉंग्रेस कडून अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने मोठा आक्षेप घेतला आहे. चंद्रपूर येथे झालेल्या प्रचार सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता अपशब्द वापरल्याने काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. जालना मध्ये काँग्रेस कडून त्यांच्या वक्तव्याविरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान 'आपण जे वक्तव्य केले आहे त्याला आणीबाणी आणि 1984 च्या शीख दंगलीचा संदर्भ आहे' असा खुलासा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तर काँग्रेसकडे विकासाचा कुठलाच मुद्दा नसल्याने काँग्रेसकडून खोटे आरोप करण्यात येत असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

कॉंग्रेसने ट्वीट केली आक्षेप असलेली क्लिप

'1984 मध्ये काँग्रेसने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप व्हायरल करुन काँग्रेसने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही' असे म्हटलं आहे. '1984 च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोकपणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावे. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही.' असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

मुनगंटीवार यांचे भाषण केवळ आक्षेपार्हच नसून समाजात विषाचे बीज पेरणारे आहे. मुनगंटीवार यांनी भाषणात महिलांबद्दलही अपमानजनक विधाने करुन महिलांची बदनामी केली आहे. अशी कॉंग्रेसची तक्रार आहे.