लोकसभा निवडणूक 2019 चे (Loksabha Elections 2019) दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. आज महाराष्ट्रात मराठवाड्यातील 9 आणि सोलापूर अशा एकूण 10 मतदार संघांत मतदान सुरु आहे. मतदान करताना मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास किंवा चित्रीकरण करण्यास परवानगी नसते. तरी देखील मात्र उस्मानाबाद येथील एका तरुणाने मतदान करताना फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे गुप्त मतदान ही संकल्पनाच मोडित निघाली आहे. तसंच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रात मोबाईल नेण्याची दिलेली परवानगी चांगली भोवली आहे.
हा तरुण उस्मानाबादच्या राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता असून त्याने चक्क फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे सांगितले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला)
'माझं मत सिंहाच्या छाव्याला' असे म्हणत या तरुणाने फेसबुक लाईव्ह केले. मात्र या व्हिडिओवरुन चर्चा रंगू लागल्याने अडचणी वाढतील म्हणून त्याने हा व्हिडिओ फेसबुकवरुन डिलिट केला.
त्याचबरोबर परभणी मतदारसंघातही असा प्रकार घडला. मतदारांनी मतदान करताना फोटोज काढले आणि आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पाठवले. तर काहींनी हे फोटोज सोशल मीडियावरही शेअर केले.