लोकसभा निवडणूक 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ठरलं! राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघातून देणार पाठींबा
NCP to support Raju Shetti's Swabhimani Shetkari Saghtana in Hatkanagale Lok Sabha constituency | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Elections 2019: स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) आणि खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांचा गड म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanagale Lok Sabha constituency). या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँगेस (Congress) पक्षाने राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणूक 2019 साठी पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राजू शेट्टी यांची ताकद अधिक वाढली आहे. दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेसकडे केलेल्या दोन जागांच्या मागणीवर राजू शेट्टी अद्यापही ठाम आहेत. काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटेनला सोडण्यावर विचार करण्यासाठी शेट्टी यांनी कांग्रेसला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसही शेट्टींच्या स्वाभिमानीसोबत जुळवून घेणार की, काही वेगळा विचार करणार याबाबत उत्सुकता आहे.

राजू शेट्टी यांच्यासोबत जागावाटपासाठी काँग्रेसची बोलणी सुरु आहेत. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली उमेदवार यादी जाहीर केली. तसेच, राजू शेट्टी यांना आपल्या कोट्यातून हातकणंगलेची जागाही सोडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राजू शेट्टी यांची चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीने ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी अद्याप राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत प्रतिक्रिया दिली नाही.

हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी हे 2009 पासून आतापर्यंत दोन वेळा निवडून आले आहेत. 2014 च्या निवडणूकीत राजू शेट्टी आणि त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही भाजप-शिवसेना युतीसोबत होती. मात्र, आता युतीतून बाहेर पडत राजू शेट्टींनी आपली स्वतंत्र भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेससोबत जागावाटपाची त्यांची चर्चा अद्याप सुरु आहे. या चर्चेचा शेवट काय होतो याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर; सुप्रिया सुळे, उदयन राजे भोसले, आनंद परांजपे यांच्या सह 11 उमेदवार जाहीर)

राष्ट्रवादी काँग्रेस - लोकसभा निवडणूक उमेदवारांची पहिली यादी
मतदारसंघ उमेदवाराचे नाव
बारामती सुप्रिया सुळे
रायगड सुनिल तटकरे
सातारा उदयनराजे भोसले
ठाणे आनंद परांजपे
कल्याण बाबाजी पाटील
कोल्हापूर धनंजय महाडीक
हातकणंगले (स्वाभिमानी शेतकरी संघटना) राजू शेट्टी
ईशान्य मुंबई संजय दीना पाटील
बुलढाणा राजेंद्र शिंगणे
जळगाव गुलाबराव देवकर
परभणी राजेश विटेकर
लक्षद्विप मोहम्मद फैजल

दम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या बारा उमेदवारांची नावे जाहीर करत लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात राजू शेट्टी यांच्या नावाचाही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून समावेश आहे.