MNS President Raj Thackeray | (File Image)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. लॉकडाऊन (Lockdown) काळात राज्याचा घटलेला महसूल पुन्हा वाढविण्यासाठी वाईन शॉप (Wine Shop) सुरु करा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना संपादकियतून टीका करण्यात आली होती. या टीकेला राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून प्रत्युत्तर दिले आहे. लॉकडाउन जाहीर करण्याआधी महाराष्ट्रात दारुबंदी नव्हती. आणि मी दारुचे गुत्ते सुरु करा असे म्हटले नव्हते. राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा, असं आपण सूचवलं होतं, असे राज ठाकरे या वेळी म्हणाले.

शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, 'काहींना वाटले की, मी तळीरामांची बाजू घेतली. पण, यात तळीरामांची बाजू घेण्याचा विषय येतोच कुठे? राज्यासमोर आज महसुली तूट आहे. ही तुट भरून काढण्यासाठी आज हा एकमेव पर्याय आहे. दुसरा पर्याय काय आहे राज्याकडे? कारखाने सुरु बोलतात. मग उघडा कारखाने.. पण ते या परिस्थितीत शक्य आहे काय?' असा सवाल उपस्थित करतानाच लॉकडाऊनचा निर्णय अचानक घेऊन नागरिकांची सरकारने गैरसोय केली, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

दरम्यान, एका रात्रीत लॉकडाऊन निर्णय जाहीर केलात ना. तर मग आता तो हटवणार कसा याबाबतही सांगा. लॉकडाऊन हटविण्याबाबत ना केंद्र सरकार बोलत आहे. ना राज्य सरकार. लॉकडाऊन काळात जनतेला किती दिवस ठेवणार आहात? आज जगभरातील अनेक देशांचे उदाहरण पाहता लोक मास्क लाऊन रस्त्यांवर फिरत आहेत. दुकानं सुरु आहेत. आपल्याकडे असे का घडत नाही. लॉकडाऊन असताना दुकाने सुरु ठेवायला काय हरकत आहे. ज्यांना दुकानात जायचं आहे ते जातील. पण, असे घडताना दिसत नाहीत, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Lockdown: 'महसूल वाढीसाठी वाईन शॉप सुरु करा'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र)

दरम्यान, राज्यातील परप्रांतीय नागरिकांनी सध्या महाराष्ट्रातच थांबणे आवश्यक आहे. महाराष्ट्रावर संकट आले असताना असा पळ काढणे योग्य नाही. तुम्ही महाराष्ट्रात येणार, पैसे कमावणार, इथल्या सेवा घेणार आणि राज्यावर संकट येणार तेव्हा पळ काढणार. असे चालणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.