Lockdown In Maharashtra: लॉकडाऊन कधी हटणार? कॅबिनेटमंत्री अस्लम शेख यांनी दिले उत्तर
Aslam Sheikh | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown In Maharashtra) झाला आहे. महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलेला हा वेताळ खाली उतरणार तरी कधी? असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे. दरम्यान, महाविकासाघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी महाराष्ट्रातील लॉकाडाऊन (Lockdown ) कधी हटणार याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. अस्लम शेख यांनी म्हटले आहे की, मुंबईसह महाराष्ट्रातील 50% जनतेचे लसीकरण ( Corona Vaccination) झाले तरच लॉकडाऊन हटवला जाऊ शकतो. राज्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा विचार राज्य सरकार नक्कीच करत आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोना परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्स आहे. त्यामुळे राज्यातील हॉटेल, सलून व्यावसायिक, इलेक्ट्रिक दुकानांना देण्याबाबत विचार होऊ शकतो. परंतू, त्याबाबत टास्क फोर्स आणि राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही शेख यांनी सांगितले.

अस्लम शेख यांनी पुढे बोलताना सांगितले की, मुंबई शहराबाबत बोलायचे तर मुंबई शहरातही नागरिकांचे 50% लसीकरण झाले तरच लॉकडाऊन हटवण्याला अर्थ आहे. अन्यथा पुन्हा एकदा कोरोनाला निमंत्रण दिल्यासारखे होईल. त्यामुळे सर्व नियम, निर्बंध यांचे पालन करुन राज्यातील उद्योजक, व्यावसायिक यांना कसा दिलासा देता येईल यावर विचारविनिमय सुरु आहे. टास्क फोर्स काय सल्ला देते यावरही विचार करुन आवश्यक आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai Local: मुंबई लोकलबाबत विजय वडेट्टीवार यांचे मोठे वक्तव्य; 1 जूननंतर सर्वसामान्यांनाही प्रवास करता येणार? वाचा सविस्तर)

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात कोरोनाची दुसरी लाट फोफावली आहे. कोरोना लाट नियंत्रणात ठेवण्याासाठी केंद्र आणि राज्य सरकारं प्रयत्न करत आहेत. त्यातूनच महाराष्ट्र सरकारने कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणामही जाणवतो आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची संख्या कमी होताना दिसत आहे. याशिवाय राज्यातील रिकव्हरी रेटही चांगलाच वाढला आहे. असे असले तरी राज्यातील मृत्यूदर हा चिंतेचा विषय ठरतो आहे.