Police| (Photo Credits: Maharashtra Police Twitter)

Mumbai Local Train: मुंबईतील माटुंगा स्थानकावर शुक्रवारी रात्री दादर-पुदुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. रेल्वेच्या या अपघातामुळे मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local Train Service) आज सकाळी विस्कळीत झाली. तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही या अपघाताचा परिणाम दिसून आला. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने पाच-दहा मिनिटे उशीर झाल्याने PSI पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. लोकल प्रॉब्लेममुळे अनेक उमेदवार वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे या उमेदवारांना प्रवेश दिला गेला नाही.

पोलीस विभागाअंतर्गत आज सकाळी 11 वाजता पीएसआय पदासाठी पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु, अचानक लोकल सेवा विस्कळीत झाल्याने अनेक उमेदवार परीक्षेसाठी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. दहा ते पंधरा मिनिटे उशीर झाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्यात आला. (हेही वाचा - Mumbai Train Accident: दादर येथे दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनची एकमेकांना टक्कर, सर्व प्रवासी सुखरूप)

या सर्व प्रकारामुळे उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली होती, तर परीक्षेसंदर्भात कालच निर्णय घ्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थांनी दिली आहे. पोलिस विभागाअंतर्गत आज घेण्यात आलेली परीक्षा तब्बल चार वर्षानंतर झाली. मात्र, काही मिनिटांचा उशीर झाल्याने अनेक विद्यार्थांची निराशा झाली आहे.

मुंबईतील माटुंगा स्थानकात शुक्रवारी रात्री दादर-पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे सीएसएमटी गदग एक्स्प्रेसला आदळल्याने स्थानकावरील सामान्य सेवा शनिवारी विस्कळीत झाली. आज दुपारपर्यंत सेवा सुरळीत होईल, असं आश्वासन मध्य रेल्वेकडून देण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे दादर-पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे मुंबई सीएसएमटी गदग एक्स्प्रेसला धडकल्यानंतर रुळावरून घसरले. या घटनेत अद्याप कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. मध्य रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. सध्या दादर पुद्दुचेरी एक्सप्रेस आणि सीएसएमटी-गदग एक्सप्रेस या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले, “प्रवासी पुढील तीन दिवसांच्या दरम्यान कोणत्याही पीआरएस केंद्रावर रद्द केलेल्या ट्रेनच्या परताव्यासाठी अर्ज करू शकतात.