राज्यात ग्रीन झोनमधील 70 हजार उद्योगांना परवाने; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
Subhash Desai (PC - Twitter)

राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या ग्रीन झोनमध्ये (Green Zone) पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 70 हजार उद्योगांना परवाने (Licenses) देण्यात आले आहेत. त्यापैकी 52 हजारांहून अधिक कारखाने सुरू झाले आहेत. यात साडेबारा लाख कामगार रुजू झाले आहेत, असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी सांगितलं आहे.

सुभाष देसाई यांनी आज वॉटर बॉटल असोसिएशनच्या वतीने आयोजित चर्चासत्रात यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्र राज्य औद्योगिकदृष्ट्या सावरत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी सहकार्य करावे. पाणी उद्योगांचा दर्जा टिकवून वॉटर बॉटल संघटनेने आपली प्रतिमा अधिक शुद्ध व तेजस्वी करावी, केवळ पाणी उद्योगावर विसंबून न राहता इतर जोड उद्योग सुरू करावेत, असं आवाहनही देसाई यांनी उद्योजकांना केलं आहे. (हेही वाचा - Maharashtra Lockdown 4 Guidelines: सार्वजनिक, खासगी वाहने Green And Orange Zones मध्ये सुरु, पाहा Containment Zones आणि इतर ठिकाणी काय सुरु काय बंद)

रेड झोनमधील अत्यावश्यक सेवा, निर्यात प्रधान उद्योग, संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य-सामग्री, सुटे भाग निर्मिती करणारे कारखाने, सिप्झ, डायमंड आदी क्षेत्रातील उद्योगांनाही उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यात रेड झोनमधील इतर उद्योगांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले असल्याचेही देसाई यांनी सांगितले आहे.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमधून लघु, मध्यम उद्योगांना विनातारण कर्ज, पीएफमध्ये दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारकडूनही लघु उद्योगांना सवलती देण्यात आल्या आहेत. या पॅकेजचा लघु उद्योजकांनी लाभ घ्यावा, असं आवाहनही यावेळी सुभाष देसाई यांनी केलं आहे.