CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANi)

महाराष्ट्रात कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 'ब्रेक द चेन' (Break the Chain) ची घोषणा केल्यानंतर अनेक कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. यात राज्यभारातील चित्रीकरण बंद करण्यात आले. याला मनोरंजन सृष्टीने पाठिंबा दिला असला तरीही एकूण या व्यवसायात गुंतवला गेलेला पैसा, त्यातून होणारा तोटा पाहता काही गोष्टींची परवानगी मिळावी, अशी मागणी इंडस्ट्रीतल्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी एका पत्राद्वारे ठाकरे सरकारला केली आहे. या आशयाचे पत्र मिडिया आणि एंटरटेनमेंट समितीने (Media and Entertainment Committee) मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

मिडिया अँड एंटरटेन्मेंट समितीने लिहिलेल्या या पत्रात चार महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, यात पोस्ट प्रॉडक्शन कामांना परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या कामांत एडिटिंग, म्युझिक, व्हिएफएक्स, डीआय, कलर करेक्शन्स.. आदींचा समावेश होतो. या कामांना परवानगी मिळावी असं या समितीला वाटतं.हेदेखील वाचा-CM Uddhav Thackeray Writes to PM Narendra Modi: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी

तसेच मुख्यमंत्र्यांनी मीडिया आणि एंटरटेन्मेंट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या गरजवंतांनाही राज्य सरकारने मदत द्यावी अशी विनंती यात करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रात काम करणा-यांसाठी लसीकरणाची दोन केंद्रे असून एक दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये तर दुसरं मीरा भाईंदर परिसरात असावं अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच यात आणखी एक महत्त्वाच मुद्दा म्हणजे सेटच्या बांधकामांचा. मुंबईसह परिसरात अनेक ठिकाणी चित्रपटांच्या, मालिकांसाठीच्या सेटची उभारणी चालू आहे. हे सेट भव्य असून त्याचा खर्च मोठा असतो. हे काम सध्या अचानक थांबल्यामुळे निर्मात्याला प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला यात सूट मिळावी तसेच सेट बांधण्यासाठीही परवानगी मिळावी असं यात मांडण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेले हे पत्र आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनाही पाठवण्यात आलं आहे.