सांगली (Sangli) शहरातील राजवाडा (Rajwada) परिसरात आज (31 मार्च) बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले. शहरात बिबट्या घुसल्याची माहिती मिळताच नागरिकांची भीतीने चांगलीच गाळण उडाली. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभआग घटनास्थळी दाखल झाला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसरात संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. महापालिका प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. बिबट्याचे दर्शन अद्याप झाले नाही. त्यामुळे आगोदर बिबट्याचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर त्याला जेरबंद करुन जंगलात सोडले जाणार आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी एक पथक कोल्हापूरहून सांगलीत आले आहे.
कोल्हापूरहून सांगलीला आलेले एक पथक बिबट्याचा शोध घेत आहे. अद्यापपर्यंत तरी बिबट्याचे दर्शन झाले नाही. परंतू वन विभागाच्या पथकाला न दिसलेला बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मात्र मोठी गर्दी केली आहे. यात काही हुल्लडबाज तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही समावेश आहे. नागरिकांनी सहकार्य करावे उगाचच गर्दी करुन थांबू नये अशा सूचना पोलीसांकडून दिल्या जात आहेत. असे असले तरी नागरिकांच्या कारणाशिवायच्या उपस्थितीमुळे बिबट्याचा शोध घेण्यास अडथळा निर्माण होते आहे. (हेही वाचा, बिबट्याचा माणसांच्या घोळक्यात शिरकाव, घाबरण्याऐवजी बिबट्यालाच दिला त्रास (Watch Video))
गेल्या काही काळापासून जंगली प्राणी नागरी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरात गवा आला होता. जंगलात मुक्त संचार करण्याची सवय असलेला गवा नागरी वस्तीत आला. त्यामुळे नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. माणूस पाहण्याची सवय नसल्याने आणि त्यातही इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी कधीच न पाहिलेला गवा जमाव बघून बिथरला. त्यामुळे तो सैरावैरा धावू लागला. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या होत्या. तरीही वन विभागाला त्याला आवर घालने अथवा पकडणे कठीण जात होते. अखेर तासभर चाललेल्या थरारानंतर गव्याला जेरबंद करण्यात यश आले. परंतू, भीतीने आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने गव्याचा या घटनेत मृत्यू झाला होता.