Leopard Attack: मुंबईतील आरे कॉलनीत गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर अधिक वाढला गेला आहे. तर बिबट्याकडून वारंवार नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत. अशातच आता बिबट्यापासून सावध राहण्यासाठी आरे कॉलनीच्या परिसरात त्या संदर्भातील सुचना फलक लावण्यात आले आहेत.(Byculla Zoo: भायखळा येथील राणीची बाग येत्या 22 ऑक्टोंबर नंतर सुरु होण्याची शक्यता)
शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते इंतेखाब फिरुकी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला असे सांगितले की, बिबट्याच्या हल्लापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात त्या संदर्भातील पोस्टर लावण्यात आले आहेत. जेणेकरुन ते पोस्टर वाचल्यानंतर स्थानिक नागरिक आपला बिबट्यापासून बचाव करण्यास तयार होतील. तर संजय गांधी नॅशनल पार्क आणि त्या लगतच्या परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर गेल्या काही दिवसांपासून वाढल्याचे दिसून आले आहे. परिसरात लावण्यात आलेल्या पोस्टरवर मराठी आणि इंग्रजी मध्ये सुद्धा माहिती दिली गेली आहे.
फारुकी यांनी पुढे असे म्हटले की, नुकत्याच दोन दिवसांपूर्वी एका 14 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना संध्याकाळी 7 वाजल्यानंतर घराबाहेर पाठवणे टाळावे असे ही आवाहन करण्यात आले आहे. आणखी महत्वाचे म्हणजे समोर आलेल्या बिबट्याला पाहिल्यानंतर घाबरुन जाऊ नये. तसेच व्यक्तीने स्तब्ध उभे रहावे आणि दोन्ही हातांनी टाळ्या वाजवाव्यात किंवा त्याच्या समोर जमिनीवर काठीने जोरात वाजवावे.
RAWW चे मानद वन्यजीवन रक्षक पवन शर्मा यांनी असे म्हटले की, वनविाभागाच्या गाड्या परिसरातील विविध ठिकाणी जात तेथील नागरिकांना बिबट्याच्या हल्ल्यापासून कसा बचाव करायचा त्याबद्दल सुचना देत आहेत. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी सहा जाळ्या सुद्धा लावण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त नागरिकांनी ग्रुपने घराबाहेर पडावे आणि उत्तम टॉर्च आपल्या सोबत बाळगावा.