अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्यावरील हल्ल्याचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. पनवेल पोलिसांनकडून चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित आहेत. या चौघांनी सलमान खानच्या कारवर पनवेलमध्येच हल्ला करण्याचा कट आखला होता. या कटाचे पाकिस्तान कनेक्शनही समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तूलने मारण्याच्या तयारीत होती, ज्याचा वापर 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येसाठी करण्यात आला होता, असे नवी मुंबई पोलिसांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पनवेलमधील सलमान खानवर त्याच्या फार्महाऊसजवळ हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या व्हॉट्सॲपसह सोशल मीडिया ग्रुप्समध्येही घुसखोरी केली आणि त्याच्या चार सदस्यांना अटक केली. (हेही वाचा - Salman Khan Residence Firing Case: सलमान खान च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी Gangster Rohit Godara ला अटक)
पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या टोळीतील चार सदस्यांनी सलमानचे पनवेल येथील फार्महाऊस, मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्याने भेट दिलेली ठिकाणे पाहिली होती. परदेशातून शस्त्रे आणण्याचे प्रयत्नही झाले होते, असे ते म्हणाले.
आरोपी धनंजय तपसिंग उर्फ अजय कश्यप (28) याला पनवेल येथून 28 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. तिसरा व्यक्ती, वास्पी खान उर्फ वसीम चिकना याला छत्रपती संभाजीनगर येथून तर रिझवान खान उर्फ जावेद खान याला बेंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे.