Lamborghini Car Killed Dog: लेम्बोर्गिनी कारने दिलेल्या धडकेत एक कुत्रा ठार झाला आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन रस्त्यावर (Fergusson College Road, Pune) ही घटना घडली. धडक इतकी जोरात होती की श्वान जागीच गतप्राण झाला. एफसी रोडवरील गुडलक चौकात हा प्रकार सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्यात एक निळ्या रंगाची Lamborghini कार आणि तिच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाकल केला आहे. नीना नरेश राय (वय-57) या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
फिर्यादी असलेल्या नीना नरेश राय या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार एका निळ्या रंगाच्या चारचाकी कारने एफसी रोडवरील गुडलक चौकात श्वानाला धडक दिली. ज्यामध्ये तो गंबीर जखमी होऊन पुढच्या काहीच वेळात जागीच ठार झाला. अपघात घडूनही घटनास्थळी थांबून, जखमी श्वानाला वैद्यकीय मदत करण्याऐवजी त्याने कारसह पलायन केले. प्रत्यक्षदर्शी असलेल्या नीना राय यांनी पोलिसांमध्ये जाऊन घडला प्रकार सांगितला. मात्र, पोलिसांनी सर्व कहाणी ऐकूण घेतली मात्र तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Aurangabad Crime: कुत्रा भुंकल्याने संतापला शेजारी, रागाच्या भरात फावडा डोक्यात घालत केली हत्या)
व्हिडिओ
फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव लेम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल, घटना CCTV कैद#Pune #Accident pic.twitter.com/dG2g31A0Cm
— Lokmat (@lokmat) August 10, 2023
दरम्यान, फिर्यादी आणि उपस्थित सजग नागरिकांनी प्रकरण लावून धरले आणि कायद्याच्या भाषेत पोलिसांना फैलावर घेतले. त्यामुळे पोलिसांचा नाईलाज झाला. अखेर त्यांनी गुन्हा नोंद केला. कार मालकालाही पोलीस स्टेशनला बोलावून घेतले मात्र गुन्हा दाखल करताना त्याचे नावच टाकले नसल्याचा दावा फिर्यादी यांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, डेक्कन पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 279, 429 सह प्राण्यास क्रूरता प्रतिबंध कायदा 11(1), 11 (A) (L) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.