Ladki Bahin Yojana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना फेब्रुवारी 2025 चा हप्ता (February Installment) अद्याप मिळाला नाही. आजपासून (25 फेब्रुवारी) तो मिळेल असे सांगितले जात आहे. परंतू, हा हप्ता मिळण्यास इतका विलंब तरी का व्हावा? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. ही योजना सरकार बंद करण्याच्या विचारात असल्याच्याही चर्चा या विलंबामुळे सुरु झाल्या होत्या. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम होता. तसेच, राज्य सरकारचीही भूमिका पुढे आली नव्हती. दरम्यान, आता महिला व बाल विकास विभागाकडून या विलंबाबाबत आणि एकूण स्थितीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच अनावश्यक आणि बिनबुडाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हप्ता मिळण्यास विलंब होण्याचे कारम काय?

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे लाडकी बहिण योजना चालवली जाते. या योजनेद्वारे राज्यातील लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जातात. पाठिमागील काही महिन्यांपासून ही योजना सुरु आहे. योजना सुरु झाल्यापासून प्रत्येक महिन्याच्या साधारण तिसऱ्या आठवड्यापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे हे पैसे जामा होतात. परंतू, या महिन्यात प्रथमच असे झाले की, 25 तरीख आली तरी लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. शेवटी महिला व बाल विकास विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम अर्थ खात्याकडून महिला व बालकल्याण खात्याला वर्ग करण्यात आली आहे. परंतू, काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्याने निश्चित कालावधीत ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वळती करण्यास विलंब झाला. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आजपासून (25 फेब्रुवारी) दिला जाणार असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना निधी मिळणार कधी? चार दिवसांत मिळाले तरच, नाहितर थेट पुढच्या महिन्यात; घ्या जाणून)

अजित पवार यांची ग्वाही

दरम्यान, लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील हप्ता देण्यास सरकारकडून विलंब झाल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. त्याच वेळी या मुद्द्यावरुन बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात भाष्य केले. त्यांनी म्हटले होते की, या योजनेसाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक 3500 कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरीही करण्यात आली आहे. येत्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना निश्चित रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. परंतू, अर्थमंत्र्यांनी ग्वाही देऊनही रक्कम वितरीत न झाल्याने सरकारवर टीका होत होती. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभावर पाणी, अनेक महिलांचे अर्ज बाद; जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, लाडकी बहीण योजना लाभार्थी असलेल्या तब्बल 2 कोटी 41 लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळाले होते. एकूण लाभार्थ्यांपैकी जवळपास 9 लाख अर्ज पडताळणीनंतर कमी झालेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात ही रक्कम आणखी घटणार असून, या महिन्यात लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे.