
Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाभार्थी असलेल्या कोट्यवधी महिला फेब्रुवारी 2025 या महिन्यातील हप्ता कधी मिळणार याबाबत प्रतिक्षा करत आहेत. उल्लेखनीय असे की, यंदा फेब्रुवारी महिना केवळ 28 दिवसांचा आहे आणि तो संपण्यास केवळ चारच दिवस बाकी आहेत. अशा स्थितीत या चारच दिवसात लाभार्थ्यांना पैसे मिळाले तर ठिक नाहीतर महिलांना हे पैसे थेट पुढच्याच महिन्यात मिळू शकणार आहेत. दरम्यान, राज्यय विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून सुरु होत आहे आणि ते 26 मार्च पर्यंत चालणार आहे. याच काळात 10 मार्च रोजी यंदाचा अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पातही काही विशेष तरतूद होणार का? याबाबत उत्सुकता आहे.
अर्जांची फेरपडताळणी आणि छाननी
लाडकी बहीण योजना राज्यात सुरु झाल्यापासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर प्रतिमहिना 1500 रुपये सरकारतर्फे जमा केले जातात. विधानसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने ही योजना अत्यंत घाईघाईने सुरु केली. ज्यामध्ये योजनेचे विविध निकष आणि पात्रता अटी असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करुन आलेले अर्ज सरसकट मंजूर करण्यातत आले. मंजूर झालेल्या अर्जांवरील लाभार्थ्यांच्या खात्यात राज्य सरकारने 1500 रुपये जमा करण्यास सुरुवातही केली. दरम्यान, त्याचा राजकीय फायदा झाल्याने महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. आता मात्र, ही योजना म्हणजे राज्याच्या तिजोरीवर अकारण भार वाढवत असल्याचे राज्य सरकारच्या लक्षात आले. मात्र, तोवर उशीर झाला होता. योजनेच्या निधीसाठी पूर्तता करता करता राज्य सरकारच्या नाकी नऊ येऊ लागले. परिणामी या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांची फेरपडताळणी आणि छाननी केली जाईल, असे राज्य सरकारकडून सांगितले जाऊ लागले. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, फक्त 20 दिवस बाकी; लाभार्थ्यांच्या खात्यावर 2100 रुपये होणार जमा?)
फेब्रुवारीचा हप्ता मार्च 2025 मध्ये?
दरम्यान, अनेक अर्जांची पडताळणी केल्यानंतर काही महिलांना लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले. म्हणजेच त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या बाजूला निकषात बसत नसल्याचे पाहून अनेक महिलांनी स्वत:हून या योजनेतून माघार घेतली आणि आपले अर्ज रद्द करावेत असा अर्ज राज्य सरकारकडे दिला. त्यामुळे राज्य सरकारच्या डोक्यावरील आर्थिक भार काहीसा कमी झाला असला तरी, तो पुरेसा नव्हता. त्यामुळे फेब्रुवारी 2025 मधील हप्ता अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर देणार आहेत, असे राज्य सरकारकडून सांगण्यात येत होते. मात्र, आता महिना संपत आला आणि आता केवळ महिन्यातील चारच दिवस बाकी आहेत. अशा वेळी राज्य सरकार लाभार्थ्यांना रक्कम देण्यास आणखी किती विलंब लावणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या महिन्यायतील हप्ता मार्च 2025 मध्ये दिला जाईल, अशीही चर्चा आहे.