Ladki Bahin Yojana | (Photo credit: archived, edited, representative image)

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांच्या खात्यावर उशीरा का होईना पण एप्रिल महिन्याचे पैसे अखेर आले आहेत. त्यामुळे योजनेबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांना अल्पसा विराम मिळाला आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनो शक्य तितक्या लवकर तुम्ही तुमचे बँक खाते (Ladki Bahin Yojana Update) तपासून पाहू शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यावर किती पैसे आले ते लगेचच समजू शकेल. अर्थात मिळालेले पैसे हे एप्रिल महिन्यातील आहेत. त्यामुळे मे 2025 महिन्यातील हप्त्याचे काय? याबाबत मात्र अद्याप तरी माहिती मिळू शकली नाही.

महिलांमध्ये नाराजी, 2100 रुपयांकडे डोळे

लेटेस्टली मराठीने लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांशी संवाद साधला असता, अनेक महिलांच्या (लाभार्थी) खात्यावर केवळ 1500 रुपयेच आल्याचे सांगण्यात आले. काही महिलांनी तर आमच्या खात्यावर फक्त 1500 रुपयेच आले आहेत, पण मार्च 2025 पासून आम्हास 2100 रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र, केवळ पंधराशे रुपयेच आल्याची तक्रारही बोलून दाखवली. काही महिलांनी अपेक्षा व्यक्त केली की, राज्य सरकार एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये बँक खात्यावर जमा केले जातील, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरल्याचे सांगितले. वाचकांच्या माहितीसाठी असे की, मे 2025 या महिन्यातील हप्ता केव्हा मिळणार याबाबत अधिकृरित्या कोणतीही पुष्टी होऊ शकली नाही. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना पुन्हा घोळात; कॅबिनेटमंत्री नरहरी झिरवळ यांचे घुमजाव)

अनेक महिलांना प्रतिक्षा

अर्थात लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे आले असल्याचे सांगितले जात असले तरी, काहींना मात्र अद्याप कोणतीही अद्ययावत माहिती मिळाली नाही. त्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे जमा झाले आहेत हे खरे. पण, काही महिलांना मात्र, त्याबातब प्रतिक्षाच करावी लागत आहे. कारण, अद्याप तरी त्यांच्या खात्यावर हे पैसे आले नाहीत. जरी हे पैसे त्यांच्या खात्यावर अद्याप आले नसले तरी, लवकरच ते आल्याचे पाहायला मिळेल, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana April Installment : आदिती तटकरे यांनी 'लाडक्या बहिणींना' दिली दिलासादायक बातमी; पहा एप्रिल महिन्याच्या हफ्त्या बद्दल काय म्हणाल्या?)

सरकारच्या इतर विभागांवर ताण

दरम्यान, लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या गळ्यातील हाड झाली आहे. ही योजना बंद होणार, असा दावा विरोधक करतात. तर ही योजना काही झाले तरी बंद होणार नसल्याचे सरकार सांगते. असे असले तरी या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर चांगलाच भार पडू लागला आहे. आता तर, सत्ताधारी पक्षातील लोकही गरज पडल्यास ही योजना बंद करा असे सांगू लागले आहेत. काही विभागांमुळे इतर खात्यांवर विनाकारण आर्थिक ताण निर्माण होऊ लागला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तर थेट अर्थकात्यावरच टीका केली आहे. सामाजिक न्याय खात्याला पुरेसा निधी मिळत नसल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. गरज नसेल तर सामाजिक खातेच बंद करा असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात लाडकी बहीण योजना अधिकच चर्चेत येण्याची शक्यता आहे.