पुणे: कोंढवा दुर्घटनेची सखोल चौकशी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश
CM Devendra Fadnavis Orders To Start Probe IN Kondhwa Case (Photo Credits: ANI/PTI)

पुण्यात कोंढवा (Kondhwa) येथे पावसामुळे भिंत कोसळून 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला व लहान मुलांचा सुद्धा समावेश असल्याचे समजत आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही  मृतांचा आकडा  वाढण्याची शक्यता आहे . या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच हा अत्यंत क्लेशदायक प्रसंग असल्याचे म्हणत त्यांनी एका ट्विट मार्फत खेद व्यक्त केला आहे. याशिवाय अशोक गेहलोत (Ashok Gehlot), सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी  देखील ट्विट करून मृतांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

देवेंद्र फडणवीस ट्विट

कोंढवा येथील आल्कन स्टायलस या सोसायटीच्या बाजूला असलेल्या इमारतीचं बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. इथे काम करणारे मजूर छोट्याश्या वस्तीत राहत होते . काल मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास सुरक्षा भिंत कोसळल्याने यातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची माहिती मिळतच पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak)  यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली, त्यानंतर हे बांधकाम त्वरित थांबवण्याचे आदेश सुद्धा टिळक यांनी दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून त्यात पालिकेचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं,

कोंढवा दुर्घटनेसाठी विशेष चौकशी समिती

पालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या माहितीनुसार, दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस दलातील अधिकारी अशी पाच जणांची समिती स्थापन केली आहे. या समितीला आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून समितीने सादर केलेल्या अॅक्शन रिपोर्टनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच सीओपीच्या टीमकडून ऑडिटही केले जाणार आहे

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांतर्फे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखाची तर शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी एक लाखाची मदत जाहीर केली आहे.