Train | File Image

कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस (Kolhapur Mumbai Sahyadri Express) कोविडच्या काळात बंद झाली होती. आता दोन ते तीन वर्षांनंतर ही ट्रेन पुन्हा पुनरूज्जिवित केली जात आहे. सध्या मुंबई मध्ये सीएसएमटी स्थानकामध्ये (CSMT Station) प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम सुरू असल्याने तात्पुरता ही ट्रेन पुणे ते कोल्हापूर (Pune Kolhapur) धावणार आहे. 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ही ट्रेन कोल्हापूर ते पुणे धावेल त्यानंतर मुंबईपर्यंत तिचा प्रवास वाढवला जाणार आहे.

मुंबई-पुण्यावरून मोठ्या संख्येने भाविक कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला येतात. त्यांच्यासाठी रस्तेमार्गासोबतच रेल्वेचा प्रवास हा आरामदायी असतो. अशावेळी ट्रेन बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत होती. फेब्रुवारी 2020 पासून सह्याद्री एक्सप्रेस बंद होती. प्रवाशांकडून ही ट्रेन पुन्हा सुरू करावी यासाठी मागणी होत होती. काही मंत्र्यांनीही त्यासाठी पाठापुरवठा केला होता.

5 नोव्हेंबरपासून दररोज रात्री 11.30 वाजता ही रेल्वे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल आणि सकाळी 7.45 वाजता पुण्याला पोहचेल. पुण्यातून रोज रात्री 9.45 वाजता सुटून ही ट्रेन कोल्हापुरात पहाटे 5.40 वाजता पोहचणार आहे.

जुलै महिन्यात खासदार महाडिक यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या सुधारणा आणि नव्या रेल्वे गाड्यांसाठी चर्चा केली होती. लवकरच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू होणार असल्याची आणि कोल्हापूरातून आणखी काही नव्या गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात याची माहिती समोर आली आहे.