नवरात्रोत्सव 2018 : कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांना ड्रेस कोडचं बंधन
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर(Photo credits: Kolhapur Tourism)

कोल्हापूर : येत्या 10 ऑक््टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये भाविक अंबाबाईच्या दर्शनाला मोठया प्रमाणात गर्दी करतात. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिर प्रशासनाने या दिवसात भाविकांना दर्शनाच्या वेळी कोणते कपडे घालून यावेत याबाबत खास नियम बनवले आहे. स्त्री आणि पुरुषांना यंदा तोकडे कपडे घालून आल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो. मिनी स्कर्ट, शॉर्ट्स घालून येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भाविकांनी मंदिरात येताना कपड्यांच्या बाबतीत भान ठेवावं, मंदिराचं पावित्र्य जपावं असे आवाहन करण्यात आले आहे.

युनि इंडिया रिपोर्ट्सनुसार, वेस्टर्न महाराष्ट्र दर्शन कमिटीने यंदा अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी कपड्यांचं भान ठेवावं असं सांगितले आहे. त्यानुसार भाविकांनी पूर्ण अंग झालेले कपडे घालावेत असा नियम बनवला आहे. कपड्यांच्या बाबतीत बनवलेले नियम हे . केवळ कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरापुरते मर्यादित नसून वेस्टर्न महाराष्ट्र दर्शन कमिटीच्या अखत्यारित असलेल्या ३००० इतर मंदिरांमध्येही अंमलात आणला जाणार आहे.महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविक तोकडे कपडे घालून आल्यास त्यांच्यासाठी मंदिर परिसरात कपडे बदलण्याची सोय,स्वतंत्र  खोली ठेवण्यात आली आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवीस्थानच्या महेश जाधव यांनी दिली आहे.

महालक्ष्मी मंदिर यापूर्वीही अनेकदा चर्चेचा विषय बनला आहे. देवीच्या मंदिर गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्यावा? देवीच्या प्रसादावरून ते थेट पुजाऱ्यांच्या समिती पर्यंत अनेक वाद रंगले होते.

काही दिवसांपूर्वी उज्जेनच्या एका मंदिरात बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकणाऱ्या एका स्त्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी बिभित्सकपणे वर्तणूक करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कडक पावलं उचलली जात आहेत