Rajaram Sakhar Karkhana Kolhapur: महादेवराव महाडिक यांना धक्का, सतेज पाटील गटाला निर्णायक बळ,  राजाराम कारखान्याचे 1346 सभासद अपात्र
Satej Patil,Mahadevrao Mahadik | (Photo Credit: Archived, edited, representative images)

भाजपचा चौखूर उधळलेला वारु कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात रोखून धरणाऱ्या सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) गटाची आणखी एक निर्णायक सरशी झाली आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे (Shri Chhatrapati Rajaram Sahakari Sakhar Karkhana ) बोगस व कार्यक्षेत्राबाहेरील 1346 सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गटाला जोरदा झटका बसला आहे. परिणामी महाडिक गट बॅकफूटला गेल्याने सतेज पाटील गटासाठी रान मोकळे झाले आहे. सहाजिकच कारखान्याच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला असून, सतेज पाटील गटाचे पारडेही जड झाले आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात जवळपास 1346 सभासदांना प्रादेशिक सहसंचालक आणि तत्कालीन सहकार पणन मंत्र्यांनी अपात्र ठरवले होते. हे सर्व सभासद बोगस व कारखाना कार्यक्षेत्राबाहेरचे होते असा या सभासदांवर आरोप होता. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयातही अपात्रतेचा हा निर्णय कायम ठेवण्यात आला. त्यामुळे महाडिक यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे सतेज पाटील यांच्या राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे सभासद अधिक असल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीनेच महाडीक गटाने बोगस आणि कारखाना कार्यक्षेत्राबाहेरचे सभासद नोंदवल्याचा आरोप केला होता आणि त्यासाठी आवश्यक कायदेशीर लढाईसुद्धा लढली होती. ही लढाई जिकल्याने आघाडीचे बळ वाढले आहे. (हेही वाचा, BJP-free Kolhapur: भाजपमुक्त कोल्हापूर, सतेज पाटील आणि महाविकासआघाडीने करुन दाखवले; चंद्रकांत पाटील याना धक्का)

दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीकडून प्रकरणात जवळपास 1 हजार 899 हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात कोल्हापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी सुनावणई घेतली होती. त्यात 484 सभासद पात्र ठरविण्यात आले होते. मात्र यातील दुबार आणि मृत असे 69 सभासद वगळले तरी 1008 अपात्र आणि 338 कार्य क्षेत्राबाहेरील अशा 1346 सभासदांना प्रादेशिक सहसंचालकांनी त्याही वेळी अपात्रच ठरवले होते.

दरम्यान, अपात्र सभासदांनी त्या वेळचे सहकार व पणन मंत्री यांच्याकडे तातडीने अपील केले. त्यावरही सुनावणी झाली तरीही हे सर्व सभासद अपात्रच ठरले. प्रादेशिक सहसंचालकांचा 14 फेब्रुवारी 2020 रोजी दिलेला निर्णय कायम ठेवत अपात्र सभासदांचे व कारखान्यांनी केलेले अपील फेटाळून लावण्यात आले होते. त्यानंतर या सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायमूर्ती मे. सी. व्ही. भडंग यांचेसमोर झालेल्या सुनावणीत 1346 अपात्र सभासदांचे अपिल फेटाळून लावण्यात आले. तसेच, आगोदरचे सर्व आदेश कायम ठेवण्यात आले.