BJP | (File Image)

काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपला कोल्हापूरकरांनी जोरदार दणका दिला आहे. महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) पुरस्कृत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजयाने आज पुन्हा एकदा कोल्हापूर भाजपमुक्त (BJP-free Kolhapur) झाले आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये कोल्हापूर भाजपमुक्त झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपला विधानसभेवर आपला उमेदवार निवडून आणता आली नाही. जयश्री जाधवांच्या विजयाने त्याची पुनरावृत्ती झाली. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर येथूनच येतात. त्यांना स्वत:ला आजवर कोल्हापूर या त्यांच्याच घरच्या मैदानावर निवडणूक लढवता आली नाही. विधानसभेत प्रवेश करण्यासाठी त्यांनी पुणे येथून गिरीष बापट यांचा कोथरुड हा सुरक्षीत मतदारसंघ निवडला आहे. या ठिकाणी भाजपच्या मुक्ता टीळक या विद्यमान आमदार असताना त्यांना वगळून भाजने चद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांना उमेदवारी दिली होती. कोल्हापुरात मात्र पाटील यांना हे आव्हान पेलता आले नाही.

कोल्हापुर जिल्ह्यात खाते उघडण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले परंतू त्यात यश आले नाही. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे लागलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात लागलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत तरी खाते उघडूया यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्यापासून ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आशिष शेलार यांच्यासारखे भाजपचे अनेक नेते कोल्हापूरात दाखल झाले होते. मात्र, कोल्हापुरकरांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला स्वीकारले नाही. (हेही वाचा, Kolhapur Election Result 2022: कोल्हापूरात महाविकासआघाडीचा डंका, जयश्री जाधव विजयी; भाजपचा दणदणीत पराभव)

कोल्हापूर विधनसभा निवडणूक 2019 निकाल आणि पक्षीय बलाबल

कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील (काँग्रेस)

कोल्हापूर उत्तर - जयश्री जाधव (काँग्रेस, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक 2022)

करवीर - पी एन पाटील (काँग्रेस)

हातकणंगले - राजीव आवळे (काँग्रेस)

कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)

चंदगड - राजेश पाटील (राष्ट्रवादी)

शिरोळ - राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष)

राधानगरी - प्रकाश आबिटकर (शिवसेना)

शाहूवाडी- विनय कोरे (जनसुराज्य)

इचलकरंजी - प्रकाश आवाडे (अपक्ष)

महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूरमध्ये भाजपला रोखून धरण्यात काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेनेचा मोठा हातभार राहिला आहे. त्यामुळे आगामी काळातही भाजपला याच आव्हानाचा सामना करावा लागणार असल्याचे दिसते.