कोल्हापूर: राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, नद्यांना पूर; परिसरात हाय अलर्ट, एनडीआरएफचे जवान तैनात
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे आलेला महापूर (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर पश्चिम घाटातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता कुठे इथले जनजीवन पुन्हा मार्गावर येत आहे, इतक्यात घाटमाथावर पाऊस थांबायची कोणतीही चिन्हे दिसेनाशी झाली आहेत. गेले काही दिवस कोल्हापुरातील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पुराचा धोका संभवतो आहे.

सध्या राधानगरी धरणाचे (Radhanagri Dam) सातही स्वयंचलित दरवाजे उघडले गेले असून, यामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आले आहेत. महत्वाचे म्हणजे पंचगंगेच्या पातळीत दोन दिवसांपासून वाढ होत आहे. आज सकाळी 10 वाजता पंचगंगेची पातळी 38.5 इतकी नोंदवली गेली होती. 39 फुट ही धोक्याची पातळी मानली जाते. जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली आहेत. पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच स्थानिकांनी योग्य वेळी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (हेही वाचा: कोल्हापूर परिसराला पुन्हा पुराची भीती; धरणक्षेत्रात अतिवृष्टी, पंचगंगेची पातळी वाढली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

बंधारे पाण्याखाली गेल्याने रस्तेमार्गांच्या वाहतुकीमध्येही अडथळा निर्माण होत आहे. खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या तीन तुकड्या परिसरात तैनातदेखील करण्यात आल्या आहेत. पावसाचा असाच जोर राहिला तर लवकरच पंचगंगा धोक्याची  पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. सोबतच वारणा आणि कोयना धरणातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग चालू असल्याने कराड आणि सांगलीलाही पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 8 फुटांवर स्थिर आहेत.