कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपूर्वीच पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता कुठे इथले जनजीवन पुन्हा मार्गावर येत आहे, इतक्यात पावसाने पुन्हा जोर धरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडले असून, जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर शहर भागात पाऊस उघडला असला तरी, धरण क्षेत्रात पावसाने जोर पकडला आहे. यामुळे पंचगंगा नदीची पातळी 33 फुटांच्यावर गेली आहे. हवामानखात्याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथावर अतीवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जाऊ शकतो. परिणामी जिल्ह्यांमध्ये पूर उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या सुरक्षेच्या दृष्टीने राधानगरी धरणाचे 5 दरवाजे खुले करण्यात आले आहेत तर कोयना, वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (हेही वाचा: Maharashtra Monsoon Forecast 2019: मुंबईत पावसाचा जोर ओसरला; मात्र विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता)
मुंबईमध्ये गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. कोकण, ठाणे, पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 6-8 सप्टेंबर दरम्यान अतीवृष्टीचा अंदाजही वर्वला गेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे कोयना, राधानगरी धरण परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे कोल्हापूर परिसरात पुन्हा एकदा पुराच्या भीतीचे सावट पसरले आहे.