Pizza | Representative Image | (Photo credits: Pixabay)

Domino's Pizza Pimpri-Chinchwad: पिझ्झा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडणारा पदार्थ. ऑनलाईन असो की, ऑफलाईन अनेकांना या पदार्थाचे नाव काढले की, तोंडाला पाणी सुटते. त्यातच जर वाढदिवस, ख्रिसमस, नवीन वर्ष प्रारंभ अथवा तत्सम काही खास कारण असेल तर हा पदार्थ ऑर्डर करण्यास निमित्तच ठरते. असे असले तरी सावधान! पिझ्झा खण्याची हौस तुम्हाला भारी पडू शकते. कधी ती जीवावर बेतू शकते किंवा आरोग्याची समस्या निर्माण करु शकते. होय, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील भोसरी (Bhosari) परिसरातील इंद्रायणी नगर येथे अशीच घटना घडली आहे. अरुण कापसे नामक एका ग्राहकाने जय गणेश साम्राज्य मधील डॉमिनोज आऊटलेटमधून पिझ्झा ऑर्डर केला होता. मात्र, धक्कादायक असे की, ऑर्डर केलेल्या या पिझ्झामध्ये चक्क लोखंडी चाकूचा तुकडा (Knife Piece Found in the Pizza) आढळला आहे. या प्रकारामुळे जोरदार खळबळ उडाली आहे.

पिझ्झात लोखंडी तुकडा पाहून ग्राहकास धक्का

अरुण कापसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी आपल्या कुटुंबासाठी काल (शुक्रवार, 3 जानेवारी) पिझ्झा ऑर्डर केला. ऑर्डरनुसार पिझ्झा आणि 596 रुपये किमतीचे बिल आले. जे आपण चुकते केले. मात्र, जेव्हा आम्ही पिझ्झा खायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आले की, पिझ्झात काहीतरी पातळ पण कडक अशी धातूसदृश्य वस्तू आहे. जी पिझ्झाचा भाग नसूनही त्यात दिसते आहे. मग आम्ही थोडे निरखून पाहिले असता, ती वस्तू म्हणजे चक्क लोखंडी चाकूचा (कटर) तुकडा होता. या प्रकारामुळे आम्हा सर्वांनाच धक्का बसला. (हेही वचा, Girl Dies After Eating Pizza: काय सांगता? पिझ्झा खाल्ल्याने 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; जाणून घ्या काय घडले)

मॅनेजरकडून उडवाउडवीची उत्तरे

अरुण कापसे यांनी पुढे सांगितले की, घडला प्रकार लक्षात येताच आम्ही तातडीने पिंपरी चिंचवड येथील ज्या दुकानातून (डॉमिनोज) पिझ्झा ऑर्डर केला त्यांच्याशी संपर्क साधला. आमचे बोलणे मॅनेजरशी होत असल्याचे सांगण्यात आले. आम्ही घडल्या प्रकाराची माहिती दिली, असता मॅनेजरने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने सुरुवातीला हात झटकत म्हटले की, आमच्याकडून अशी चूक होत नसते. आम्ही लोखंडी चाकू पिझ्झा कापायला वापरतच नाही. आम्ही लाकडीच चाकू वापरतो. पण, मग जेव्हा आम्ही त्यांना पिझ्झा खरेदी केल्याचे बिल आणि फोटो पाठवले तेव्हा मात्र मॅनेजर स्वत: आमच्या घरी आला. त्याने आम्हास सांगितले की, घडलेल्या घटनेची कोठेही वाच्यता करु नका. आम्ही तुम्हाला या बदल्यात दुसरा पिझ्झा देतो. किंवा तुम्हाला आणखी काही ऑर्डर हवी असल्यास सांगा. (हेही वाचा, Fake Domino's Pizza Restaurant Stores on Swiggy: फूड डिलिव्हरी ॲप Swiggy वर Domino's Pizza चे बनावट आउटलेट)

दरम्यान, आपणास आलेला अनुभव भयंकर होता. जो आमच्या जीवावर बेतू शकला असता किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यास आरोग्यासंबंधी समस्यासुद्धा निर्माण होऊ शकली असती. त्यामुळे आपण परिसरातील नागरिकांना अवाहन करत आहोत की, जय गणेश साम्राज्य मधील डॉमिनोज पिझ्झा मधून कोणीही पिझ्झा खरेदी करू नये. दरम्यान, हे अवाहन करत असताना पीडित अरुण कापसे यांनी पिझ्झा खाताना आपण किरकोळ जखमी झाल्याचा दावाही केला आहे.