JNU Protest : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल; किरीट सोमय्या यांनी पोलिसांत केली तक्रार
Kirit Somaiya and Jitendra Awhad (Photo Credits: Facebook Twitter)

जेएनयूच्या परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटू लागले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. याआंदोलनात विद्यार्थ्यांसह अनेक क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. मात्र या आंदोलनात 'काश्मीर को चाहिए आझादी' अशा घोषणा केल्याचा आरोप भाजपने केला होता. या आंदोलनात गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) सामील झाले होते. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या गोष्टीची दखल घेत आव्हाडांवर विरुद्ध तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 जानेवारीला जेएनयूमध्ये अचानक तोंडाला मास्क लावून आलेल्या गुंडांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही जखमी झाले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थी, कलाकारांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी झाले होते.

जितेंद्र आव्हाडांचे ट्विट:

हेदेखील वाचा- JNU मधील हल्ल्याच्या निषेधार्थ चित्रपट सेलिब्रिटींंनी नोंदवला निषेध; रिचा चड्ढा, विशाल भारद्वाज, तापसी पन्नू, दिया मिर्झा, अनुराग कश्यप आदींचा सहभाग (Video)

मात्र या आंदोलनात‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्याचा आरोप भाजपानं केला होता. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही यावर आक्षेप घेतला. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

“ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध आणि देशविरोधी ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आलं असून, मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी सोमय्या यांनी तक्रारीत केली आहे.