Khelo India Youth Games 2019 | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Khelo India Youth Games 2019: अवघ्या क्रीडा विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेला आजपासून (बुधवार, 9 जानेवारी) सुरुवात होत आहे. पुणे (Pune) येथील बालेवाडी क्रीडा संकूल (Balewadi Complex) येथे 9 ते 20 जानेवारी या काळात या स्पर्धा पार पडत आहेत. दरम्यान, इतक्या मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा मान महाराष्ट्र आणि त्यातही पुण्याला मिळणे हा राज्याच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब असल्याची भावना क्रीडारसिकांकडून व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेत देशभरातील प्रतिभावंत क्रीडापटूंच्या नेत्रदीपक खेळीचे प्रदर्शन क्रीडाप्रेमिंना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून एकूण 6 हजार खेळाडू आल्याची माहिती आहे.

दरम्यान, देशभरातील क्रीडा वर्तुळाचे लक्ष असलेली ही स्पर्धा चोख पार पडावी यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. क्रीडा आयुक्त सुनील केंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली आठ उपसंचालक, 120 अधिकारी काम करत आहेत. यात जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक आणि क्रीडा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचेही (साई) २० अधिकारीही कार्यकरत आहेत. या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कसर राहता कामा नये यासाठी गेली 65 दिवस हे अधिकारी अहोरात्र कार्यरत आहेत. (हेही वाचा, IPL Season 12 भारतामध्येच रंगणार, 23 मार्च 2019 पासून सुरू होणार आयपीएल 12 चे सामने!)

दरम्यान, पुण्यासारख्या प्रसिद्ध शहरात ही स्पर्धा पार पडत असताना क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मात्र ही स्पर्धा म्हणवी तितकी गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केवळ दोनवेळच स्पर्धास्थळाला भेट दिली आहे. गेली दोन महिने स्पर्धास्थळी (बालेवाडी) तयारी सुरु आहे. या कालावधीत विनोद तावडे यांनी पाच वेळा पुणे दौरा केला. मात्र, तावडे स्पर्धेच्या ठिकाणी फिरकलेच नाहीत. नाही म्हणायला त्यांनी दोन वेळा स्टेडीयमची पाहणी केली. मात्र, या दोन वेळच्या भेटीमध्येही तब्बल एक महिन्याभराचे अंतर आहे. महत्त्वाचे म्हणजे इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजकत्त्व महाराष्ट्राला पहिल्यांदाच मिळाले आहे.