खार (Khar) मधील पूजा अपार्टमेंट (Pooja Apartment) येथील पाच माजली इमारतीचा काही भाग आज (24 सप्टेंबर) रोजी दुपारच्या वेळेस कोसळला होता. या दुर्घटनेत बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या 10 वर्षीय माही मोटवानी (Mahi Motvani) हिचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. घटनास्थळी बचावकार्य करत असणाऱ्या एनडीआरएफ पथकाने अथक प्रयत्न करत माही हिला ढिगाऱयाखालून बाहेर काढले, त्यावेळीस तिचा श्वास सुरु असल्याने तिला जवळील लीलावती हॉस्पिटल (Lilavati Hospital) मध्ये ताबड्तोब दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असतानाच माही ने अखेरचा श्वास घेतला.
मुंबई मिरर दैनिकाच्या माहितीनुसार, आज दुपारी साधारण 1 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास खार पश्चिम येथील 17 व्या मार्गावर स्थित पूजा बिल्डिंग मध्ये हा अपघात घडला. या पाच माजली इमारतीचा काही भाग कोसळून इमारतीखाली काहीजण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत होती.सुरुवातीला हि घटना घडताच लगेचच बिल्डींग खाली करण्यात आली, तसेच अग्निशमन दल व एनडीआरएफला सूचित करण्यात आले.अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते मात्र तरीही माही या चिमुकलीला वाचवण्यात उशीर झाला आणि त्यामुळे तिचा नाहक मृत्यू झाला आहे.
ANI ट्विट
#UPDATE: Mahi Motvani who was trapped in the debris of a partially collapsed building at Khar road was declared brought dead at Lilavati Hospital. #Maharashtra https://t.co/CC7yQVptYr— ANI (@ANI) September 24, 2019
दरम्यान, ही संबंधित इमारत धोक्याचे बांधकाम किंवा अन्य कोणत्याही असुरक्षित जागी नसूनही हा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अचानक ओढवलेल्या या संकटामुळे मोटवानी कुटुंबीयांसह अन्य नागरिकांकडून संताप व दुःख व्यक्त केले जात आहे.