Katol Municipal Council: गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातील काटोल नगर परिषद नगराध्यक्षांसह 18 नगरसेवक अपात्र
Indian Politicians | (File Image)

राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या काटोल नगर परिषदेतील ( Katol Municipal Council) नगराध्यक्षांसह 18 नगरसेवक अपात्र ठरले आहेत. राज्याच्या नगरविकास विभागाने याबाबत आदेश काढले आहेत. काटोल नगरपरिषदेत विदर्भ माझा (Vidarbha Maza) आणि भाजप (BJP) युतीद्वारे सत्तेत होते. थेट नगराध्यक्षच अपात्र ठरल्याने सत्ताधारी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, अपात्रतेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्राप्त माहितीनुसार, काटोल नगर परिषदेत नगराध्यक्षांसोबतच उपाध्यक्षही अपात्र ठरविण्यात आले आहेत. निधीचा अपहार केल्याची तक्रार विरोधकांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

काटोल हा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे. काटोल नगर परिषदेत तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विदर्भ माझा या पक्षाने जोरदार मुसंडी मारली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली होती. पुढे विदर्भ माझा या पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करत काटोल नगरपरिषदेवर सत्तेचा झेंडा फडकवला होता. (हेही वाचा, चंद्रपूर: सुधीर मुनगंटीवार यांना धक्का; गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकसआघाडी विजयी, भाजपला केवळ 2 जागा)

दरम्यान, राज्यात महाविकासआघाडी सरकारची सत्ता आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे पक्ष सत्तेत आहेत. तर भाजप विरोधात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हेसुद्धा नागपूरमध्ये येतात आणि काटोल हे देखील नागपूरमध्येच आहे. त्यामुळे येत्या काळात काटोल नगर परिषदेच्या मुद्द्यावरुन जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले तर नवल वाटायला नको.