ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना-भाजपा सोबत गेलेल्या अजित पवार गटासाठी काटेवाडीतील ग्रामपंचायत निकाल (Katewadi Gram Panchayat Election Results) महत्त्वाचे होते. राज्यात ग्रामपंचायत निकालामध्ये भाजप (BJP) अव्वल आहे. तर दुसर्या स्थानी अजित पवारांचा (Ajit Pawar) गट होता. पण काटेवाडी मध्ये अजित पवार गट अव्वल ठरला आहे. शरद पवारांविरोधात दंड थोपटल्यानंतर अजित पवारांसमोर त्यांचं सामर्थ्य निवडणूकीच्या रिंगणात दाखवणं देखील महत्त्वाचं होतं त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणूका देखील अजित पवारांसाठी महत्त्वाच्या होत्या. एकूण 16 पैकी 14 ठिकाणी अजित पवार गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर 2 ठिकाणी पहिल्यांदाच भाजपाचा विजय झाला आहे.
काटेवाडी हे अजित पवारांचं गाव असल्याने येथील निकाल महत्त्वाचे होते. राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार भाजपा सोबत सत्तेमध्ये बसले असले तरीही ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ते भाजपासमोर उभे ठाकले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका अधिक चुरशीच्या झाल्या होत्या. अजित पवार गट पुरस्कृत जय भवानी माता पॅनलचा काटेवाडीतून विजय झाला आहे. पण काटेवाडी ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली एक हाती सत्ता आता त्यांनी गमावली आहे.
काटेवाडीप्रमाणे बारामती मध्येही अजित पवारांचे वर्चस्व बघायला मिळाले आहे. बारामतीत आत्तापर्यंत 22 गावांचा निकाल हाती आला आहे. त्यापैकी 21 राष्ट्रवादीकडे आहेत तर एका गावचा सरपंच भाजपचा आहे. ईश्वरचिठ्ठीने लावलेल्या निकालात कौल भाजपाच्या पारड्यात पडला आहे. बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी येथे भाजपचा पहिला संरपंच विजयी झाला आहे.