Karan Johar Party: आशिष शेलार यांनी त्यांचे आरोप सिद्ध करावे, अन्यथा जाहीर माफी मागावी- Mayor Kishori Pednekar
Kishori Pednekar | (Photo Credit: Twitter/ANI)

नुकतेच करीना कपूरला (Kareena Kapoor) कोरोनाची (Coronavirus) लागण झाली. त्याआधी करीनाने करण जोहरच्या पार्टीला (Karan Johar Party) उपस्थिती लावल्याचे दिसून आले. या पार्टीमध्ये सहभागी इतर काही सेलेब्जनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता हा एक राजकीय मुद्दा बनला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बॉलीवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या घरी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला, महाराष्ट्र सरकारचे मंत्री देखील उपस्थित होते की नाही याबाबत माहिती द्यावी अशी मागणी बीएमसीकडे केली होती. आता यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.

करण जोहरच्या घरी आयोजित केलेल्या पार्टीला महाराष्ट्रातील एका मंत्र्याने हजेरी लावल्याचा आरोपावर, किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या आहेत आशिष शेलार यांनीच पार्टीत सहभागी झालेल्या मंत्र्याचे नाव सांगावे अन्यथा त्यांनी माफी मागावी. करणने आयोजित केलेल्या पार्टीनंतर दोन कलाकारांची कोविड-19 साठी पॉझिटिव्ह चाचणी झाल्यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने चाचण्यांचा सपाटा लावला होता. त्यानंतर शेलार यांनी दावा केला की या पार्टीला एक राज्यमंत्री देखील उपस्थित होते.

शेलार यांनी सांगितले होते की संबंधित इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जावी. आता शिवसेनेच्या प्रवक्त्या असलेल्या पेडणेकर यांनी भायखळा येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना, शेलार यांना त्यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे देण्यास सांगितले आणि बिनबुडाचे आरोप करून अनावश्यक वाद निर्माण केल्याबद्दल भाजपला फटकारले. बीएमसीने पार्टीसंदर्भात आवश्यक कारवाई केली आहे, असेही त्या म्हणाल्या. (हेही वाचा: Pornography Case प्रकरणी राज कुंद्राने सोडले मौन, विधान जाहीर करत म्हटली 'ही' गोष्ट)

याआधी, बीएमसीने सांगितले होते की त्यांनी पार्टीत सहभागी झालेल्यांची यादी तयार केली आहे आणि त्यांची कोरोना व्हायरसची चाचणी घेतली जाणार आहे. यापूर्वी, किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांच्या एक वक्तव्य आक्षेपार्ह आणि महिलांसाठी असभ्य असल्याचे सांगत, शेलार यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. आता महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वादाचे हे नवे प्रकरण समोर आले आहे.