महाराष्ट्रात आज जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या उत्तम वानखेडे (Uttam Wankhede) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमध्ये एकूण 56 सदस्य असून त्यावर सत्ता काबीज करण्यासाठी 29 सदस्यांशी आवश्यकता होती. त्यानुसार शिवसेनेकडे 14, राष्ट्रवादी कडे 13 आणि कॉंग्रेस कडे 5 सदस्य होते. त्यामुळे शिवसेनेच्या उत्तम वानखेडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने त्याच पॅटर्न आता जिल्हा परिषदेमध्येही शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांनी हातमिळवणी करून भाजपाला सत्तेपासून दूर केलं आहे. दरम्यान ही महाविकास आघाडी जिल्हा परिषदेमध्येही रहावी याकरिता शिवसेनेचे अर्जुन खोतकर, राष्ट्रवादीचे राजेश टोपे, कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी प्रयत्न केले होते. दरम्यान जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे त्यांना जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुक: धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध निकालाआधीच पंकजा मुंडे यांनी स्वीकारला पराभव.
दरम्यान जालना जिल्हा परिषदेच्या निवडणूकीमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. ही निवडणूक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली असून दीडच्या सुमारास मतदानाला सुरूवात झाली त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला आहे.