
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांसह मृतांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आणि वैद्यकीय विभागावर कामाचा मोठा ताण पडला आहे. अशातच माणुसकीवा काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालनाच्या (Jalna) एका कोविड जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड बॉयने एका मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरून त्यांच्या बँकेतील रक्कम आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित वार्ड बॉयविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
कचरू पिंपराळे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते जालना शहराच्या इंदिरानगर येथील रहिवाशी होते. कचरू यांना गेल्याकाही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. ज्यामुळे जिल्हा कोविड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. परंतु, कचरू यांच्या मृत्युनंतर त्यांच्या बॅंक खात्यातून काही पैसे गायब झाले, हे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बॅंक स्टेटमेन्ट आणि मोबाईल डिटेल तपासून पाहिले. त्यावेळी कचरू पिंपराळे यांच्या मोबाईलमधून अंगठ्याचा ठसा वापरून फोनपे द्वारे 6 हजार 800 रुपये ट्रान्सफर केल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर कचरू यांच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या संदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Virar Hospital Fire: विरार दुर्घटनेबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण
मोमीन मोसीन असे आरोपीचे नाव आहे. मोमीनेच कचरू यांच्या खात्यातून फोन पे द्वारे 6 हजार 800 रुपये गायब केल्याचे पुरावे नातेवाईकांच्या हाती लागले आहेत. याशिवाय, मृताजवळील 34 हजार रुपयांची रोख रक्कम आणि चांदीची अंगठीदेखील चोरी झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.