महाराष्ट्रातील जालना (Jalna) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोप आहे की, इथे एका गावात अज्ञात लोकांनी मशिदीत घुसून इमामला (Imam) जय श्री राम (Jai Shri Ram) म्हणण्यास भाग पाडले व त्यांनी त्यास नकार दिल्यावर इमामला मारहाण केली. एवढेच नाही तर इमामची दाढीही कापली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. इमामला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर वातावरण चिघळू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
ही बाब रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पीडित झाकीर सय्यद खाजा हे भोकरदन तालुक्यातील अन्वा गावातील मशिदीत इमाम असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी ते मशिदीत एकटेच होते आणि कुराण पठण करत होते. घटनेनंतर जेव्हा गावातील लोक मशिदीत पोहोचले तेव्हा इमाम बेशुद्ध पडले होते. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या आणि त्यांची दाढीही कापली होती. त्यानंतर ताबडतोब त्यांना उचलून रुग्णालयात नेण्यात आले. तिथून त्यांना औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) दाखल करण्यात आले.
इमामने पोलिसांना घटनेबाबत सांगितले की, काही लोक मशिदीत घुसले. त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि जय श्री राम म्हणण्यास भाग पाडले. यावेळी त्यांनी जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्याने त्यांना आणखी मारहाण करण्यात आली व त्यांची दाढी कापली. त्यांचा अपमान करून तसेच बेशुद्धावस्थेत सोडून ते निघून गेले. (हेही वाचा: अतिक अहमद याला जन्मठेप आणि 5,000 रुपयांचा दंड; प्रयागराज येथील कोर्टाचा उमेश पाल प्रकरणात निकाल)
पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले असून शांतता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे निरीक्षक अभिजीत मोरे यांनी सांगितले.