Raosaheb Danve, Girish Mahajan | (Photo Credit: Archived, edited, representative images)

जळगाव (Jalgaon) जिल्हा भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या वादाची परिणीती आज मोठ्या राड्यात आणि हाणामारीत झाली. विशेष म्हणजे हा राडा भाजप (BJP) माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासमोरच झाला. हा राडा सुरु असताना गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करताना दिसले. तर, रावसाहेब दानवे यांनी व्यासपिठावरुन काढता पाय घेतला. भुसावळ अध्यक्ष पदासाठी जळगावमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, भुसावळ भाजप अध्यक्षपद नवडणुकीसाठी जळगाव येथे पक्ष कार्यकर्त्यांची एक बैठक शुक्रवारी (10 जानेवारी 2020) बोलविण्यात आली होती. या बैठकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि आमदार गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थित बैठकीला सुरुवात झाली. दरम्यान, पक्षातील दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोलापाल गेला की, कार्यकर्त्यांनी एकमेकांवर शाईफेक केली. त्यातच पुन्हा काही क्षणांमध्येच थेट हाणामारीला सुरुवात झाली. पक्षाचे दोन वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित असतानाच हा वाद सुरु झाल्याने रावसाहेब दानवे यांनी व्यासपिठावरुन निघून जाने पसंत केले. (हेही वाचा, मानखुर्द येथे भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा)

विधानसभा निवडणूक 2019 पासून जळगाव जिल्हा भाजपमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. या संगर्षाची सुरुवात विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारल्यापासून झाल्याचे जळगावमधील अनेक भाजप कार्यकर्ते सांगतात. महत्त्वाचे म्हणजे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव पक्षातीलच काही नेत्यांमुळे झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी अलिकडेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे आपलं तिकीट कापण्यात आल्याचा खळबळजक आरोप केला होता. त्यानंतर या बैठकीत उफाळून आलेला वाद हे सर्व पाहता भाजपमध्ये सर्वच काही अलबेल आहे असे चित्र दिसत नाही.