कारची रेस (Car Race) लावण्याच्या रिकाम्या उठाठेवीमुळे एका अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा बळी गेला आहे. ही घटना जळगाव (Jalgoan) शहरातील महरुण तलाव परिसरात रविवारी (28 ऑगस्ट) घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावही निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात कारची स्पर्धा लावणारे तरुण आणि कारचा मालक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरपर्यंत सुरु होती.
जळगाव शहरातील महरुण तलाव परिसरात काही तरुणांनी कारची रेस लावली. या तरुणांनी अत्यंत बेकायदेशीररित्या आणि भरधाव वेगात लावलेल्या कारच्या रेसमध्ये एक इनोव्हा कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करुन पुढे जात होती. दोन्ही कारमध्ये असा जीवघेणा प्रवास बराचक काळ सुर होता. दरम्यान, त्यातील एक कार शर्यतीदरम्यन पुढे काढण्याचा चालकाचा प्रयत्न सुरु असतानाच चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याकडेने सायकल चालवत असलेल्या मुलाच्या अंगावर चढली. यात विक्रांत मिश्रा नामक मुलाचा हाकनाक बळी गेला. (हेही वाचा,Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सातवीत शिकणाऱ्या मुलीचे लैंगिक शोषण, तीन आरोपींसह सात जणांना अटक )
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, कार चालकाकडून कारवरील नियंत्रण सूटल्यानंर ब्रेकच्या ऐवजी एक्सलेटर दाबला गेला. त्यामुळे कारचा वेग मूळ वेगाच्या दुप्पट झाला. त्यामुळे ही दुप्पट वेगाने धावणारी कार जाऊन विक्रांत मिश्रा या सायकल चालवणाऱ्या मुलाला जाऊन धडकली. ज्यात विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. विक्रांत हा मेहरुण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. विक्रांत हा मिश्रा परिवारातील एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे मिश्रा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कारची धडक इतकी जोरात होती की, विक्रांत आपल्या सायकलसह सुमारे दहाफूट वर हवेत उडाला आणि मग खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या बाजूला पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. सर्व मुले ही अल्पवयीन असल्याची माहिती आहे. विक्रांत जखमी झाल्याचे लक्षात येताच या सर्वांनी त्याला दवाखन्यात दाखल केले. मात्र, तिथे त्याला मृत घोषीत करण्यात आले.