Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री निवास सोडण्याचा निर्णय माझा नव्हता, आम्ही ‘वर्षा’ बंगला सोडला, 'इच्छाशक्ती' नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray | (Facebook)

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दादर येथील शिवसेना भवनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना आणि संपर्क प्रमुखांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान 'वर्षा' रिकामे केले आहे, पण लढण्याची इच्छाशक्ती सोडलेला नाही. आमचा निर्धार कायम आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, पक्षाला यापूर्वी बंडखोरींचा सामना करावा लागला आहे, सर्व कारस्थानं करूनही आमचं सरकार दोनदा सत्तेत आले आहे. मी 'वर्षा' हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडले आहे, पण निर्धार सोडलेला नाही. गेल्या अडीच वर्षांत, आम्ही आमच्या प्रकृती अस्वास्थ्यासह कोविड-19 महामारीशी लढलो. या परिस्थितीचा फायदा विरोधकांनी घेतला. यावेळी शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे हे देखील शिवसेना भवनात उपस्थित होते. (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: बंडखोर एकनाथ शिंदे शिवसेनेवर कब्जा करणार का? कायदा काय म्हणतो? जाणून घ्या)

याशिवाय वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मला सत्तेचा लोभ नाही. आम्ही मरणार पण शिवसेना कधीच सोडणार नाही असे म्हणणारे आज पळाले. बंडखोर आमदारांना शिवसेना फोडायची आहे. हिम्मत असेल तर त्यांनी बाळासाहेब आणि शिवसेनेचे नाव न घेता लोकांमध्ये जावे.

दरम्यान, आसाममधील गुवाहाटीमध्ये तळ ठोकलेल्या बंडखोर गटाने शिवसेनेच्या 38 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मी देशातील सर्व आमदारांना आसाममध्ये येण्याचे निमंत्रण देतो. महाराष्ट्रात कधी सरकार स्थापन होईल माहीत नाही पण ते जितक्या दिवस येथे असतील ती माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मला उद्धव ठाकरेंनाही सुट्टीसाठी आमंत्रित करायचे आहे.