Sandeep Deshpande (Photo Credits: Facebook)

नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून देशातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. तसेच केंद्र सरकारच्या या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी अनेक राज्यातून आवाज उठवला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. महत्वाचे म्हणजे, नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकत्व दुरूस्ती कायद्यासंदर्भात आपले मत मांडले. त्यावेळी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, असे विधान केले होते. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) बदलत्या भुमिकेवरून ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. यात हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख लोकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणे आवश्यक असते. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन 6 वर्षांवर आली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला विरोध दर्शवला होता. तसेच हा कायदा महाराष्ट्रात लागू होणार नाही, असेही स्पष्ट केले होते. नुकतीच उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भुमिकेत बदल केला आहे. शिवसेनेच्या याच बदलत्या भुमिकेवरून संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभेत CAA NRC ला पाठिंबा राज्यसभेत विरोध , पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा ,वाघ आहे का बेडूक..... असा आशायाचे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. हे देखील वाचा- महाविकास आघाडीच्या मंत्र्यांसाठी मुंबईमध्ये उभारले जाणार 18 मजली अलिशान टॉवर; जाणून घ्या काय असेल खास

संदीप देशपांडे यांचे ट्वीट-

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

सीएए, एनपीआर, एनआरसीच्या मुद्द्यांवर पंतप्रधानांसोबत माझी चर्चा झाली. या मुद्द्यांवर यापूर्वीच मी माझी भूमिका सामना मध्ये मांडली आहे. सीएएला घाबरण्याचे काहीही कारण नाही. हा कायदा कुणालाही देशातून काढण्यासाठीचा कायदा नाही. एनआरसीबाबत जे वातावरण तयार केले जाते आहे की, मुस्लिमांनाच त्रास होणार. ते चुकीचे आहे. सगळ्यांनाच आपल्या नागरिकत्वासाठी रांगेत उभे रहावे लागणार आहे. या मुद्द्यावरुन ज्यांनी आंदोलन भडकवले आहे, त्यांनी कायदा आणि इतर गोष्टी समजून घ्यायला हव्यात, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यापासून आक्रमक पवित्रा घेतल्याचे चिन्हा दिसत आहेत. यातच मनसे नेते यांनीही शिवसेनेला धारेवर धरले आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेल्या वक्तव्याला शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.