महाविकास आघाडीच्या मंत्र्यांसाठी मुंबईमध्ये उभारले जाणार 18 मजली अलिशान टॉवर; जाणून घ्या काय असेल खास
Building | Image of a construction site used for representational purpose | Image: Flickr

आपल्या मंत्र्यांसाठी, तब्बल 18 मजली निवासी टॉवर (18-Storey Residential Tower) बांधण्याची योजना महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) आखली आहे. हा टॉवर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या (Malabar Hill) भूखंडावर बांधला जाऊ शकतो. हा प्लॉट 2584 चौरस मीटर भागात पसरलेला आहे आणि त्यावर बांधलेला 'पुरातन' बंगला सुमारे 105 वर्ष जुना आहे. 119 कोटींच्या या प्रकल्पास सचिवांच्या समितीने मान्यता दिली आहे. रिकामी व मोडकळीस आलेली इमारत पडून ही नवी इमारत बांधली जाणार आहे. या नव्या इमारतीमध्ये 18 मंत्र्यांना घर देण्यात येईल, असे सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.

या संपूर्ण बांधकामांचे एकूण क्षेत्रफळ 10337.80 मीटर असणार आहे. प्रत्येक मंत्र्याला मिळालेल्या जागेत, 574 चौरस मीटरमध्ये बांधकाम केले जाईल. यामध्ये राहण्याची खोली, चार बेडरूम, स्वयंपाकघर, कार्यालय, अतिथी अंगण, बैठक, दोन स्टाफ रूम आणि इतर सुविधांचा समावेश असेल. तेथे अभ्यागतांसाठी स्वतंत्र लॉबी आणि लिफ्ट असेल. मंत्री आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त पाहुणे आणि पाहुण्यांच्या येण्या जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. हा प्रकल्प लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे परवानगीसाठी पाठविला जाईल, अशी माहिती मिळत आहे. (हेही वाचा: ग्रामपंचायत मार्फत सरपंच निवडीच्या निर्णयाला राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून ब्रेक; उद्धव ठाकरे सरकारला धक्का)

दरम्यान,  सार्वजनिक बांधकाम विभागाने महाविकास आघाडी मधील 31 मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी निविदा काढल्यात आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास 15 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. म्हणजेच एका बंगल्यावर साधारणत: 80 ते दीड कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. ही गोष्ट समजताच बंगल्यांवर होणारा खर्च मर्यादित ठेवा, असा आदेश अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.