CM Eknath Shinde (File Image)

इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी (Irshalwadi Landslide) तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इरशाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला आणि शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यांत होईल, असा विश्वास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी सायंकाळी चारच्या सुमारास इरशाळवाडीला भेट दिली.

यावेळी त्यांनी तात्पुरत्या निवासाची सोय केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी काही घरांमध्ये जाऊन तेथील सुविधेची पाहणी करताना त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.

गेल्या महिन्यात 20 जुलैला इरशाळवाडी दुर्घटना झाली होती. त्यातून बचावलेल्या नागरिकांच्या निवासाची सोय मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याठिकाणी करण्यात आली आहे. सुमारे 42 कंटेरनरमध्ये या नागरिकांची सोय करण्यात आली आहे. शिवाय अन्य दहा कंटेनरमध्ये दवाखाना, अंगणवाडी, पोलीस नियंत्रण कक्ष, आपत्कालीन नियंत्रण कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 2023 मध्ये सात महिन्यांत तब्बल 1,061 मृत्यूंची नोंद)

या घटनेला महिना होण्याच्या आतच आज मुख्यमंत्री पुन्हा इरशाळवाडीवासियांच्या भेटीसाठी आले. ज्यांनी आपल्या कुटुंबातील आप्तस्वकीयांना गमावले त्यांना आपुलकीने धीर दिला. दुर्घटनेची पडछाया अजून याठिकाणी कायम आहे, परंतु आजच्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवितानाचा स्वतः मुख्यमंत्री आपल्या पुनर्वसनासाठी भक्कमपणे पाठीशी असल्याचा विश्वास दिला. जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी सातत्याने गावकऱ्यांच्या संपर्कात आहेत. जे जीव वाचलेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम शासनातर्फे होत आहे.