संतती जन्माच्या बाबतीत एका कीर्तनात समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी जन्माला येते असे वादग्रस्त विधान केल्याने प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj ) चांगलेच गोत्यात सापडले होते, अनेक संस्था संघटना व व्यक्तींनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागण्या सुद्धा केल्या होत्या, मात्र या सर्व प्रकारावर आता अखेरीस इंदुरीकर महाराजांनी रीतसर माफीनामा प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त केली आहे, आपण केलेले विधान हे आपल्या अभ्यासानुसार आहे मात्र त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण त्यासाठी क्षमा मागतो असे इंदुरीकरांनी आपल्या माफीनाम्यात स्पष्ट लिहिले आहे, मात्र आपल्या वाक्याचा विपर्यास करून दाखवण्यात आला यामध्ये मीडियाचा हात आहे असेही ते म्हणाले आहेत.
इंदुरीकर महाराज यांनी माफीनामा जारी करत त्यामध्ये, "माझ्या अभ्यासानुसार मी काही वक्तव्य केलं होतं. त्याचा गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून विपर्यास केला जात आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून गेल्या 26 वर्षांपासून समाजप्रबोधनाचं आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करत आहे. गेल्या 26 वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही अथक प्रयत्न केले होते. मात्र माझ्या कीर्तनरुपी सेवेतील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, असं इंदुरीकर महाराज यांनी या माफीनाम्यात म्हटलं आहे. इंदुरीकर यांनी राज्यातील सर्व वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि आई समान असलेल्या सर्व महिला वर्गांना उद्देशून हा माफीनामा जारी केला आहे.
इंदुरीकर महाराज यांचा माफीनामा
दरम्यान, 'सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,' असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या एका कीर्तनात केलं होतं. यावर अनिंस सह सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. हा वाद वाढायला लागताच मध्यंतरी इंदुरीकरांनी आपली कॅपिसिटी संपली असे म्हणत आता कीर्तन सोडून शेती करू अशीही तयारी दर्शवली होती. आता या माफीनाम्यावरून वाद निवळण्याची शक्यता आहे.