इंदुरीकर महाराज म्हणतात कॅपिसिटी संपली; तीन दिवसात अर्धा किलो वजन घटले
Indurikar Maharaj (PC - Facebook)

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी जन्माला येते असे वादग्रस्त विधान केल्याने प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj ) चांगलेच गोत्यात सापडले आहेत. गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करणाऱ्या इंदूरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जालना येथील सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार ( Nanda Pawar) आणि अंधश्रद्धा निर्मूलन संघटनांतर्फे करण्यात आली होती. या सर्व वादावर आता स्वतः इंदुरीकर यांनी प्रतिक्रिया देत हा वाद सहन करण्याची माझी कॅपिसिटी संपली आहे, दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे.यापुढे जर वाद थांबला नाही तर एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,' असं इंदुरीकर यांनी सांगितले आहे. मागील तीन दिवसात इंदुरीकर यांचे अर्धा किलो वजन देखील घातल्याचे समजतेय. किर्तनकार इंदुरीकर महाराजांना संगमनेर येथील वैद्यकीय विभागाकडून नोटीस

काल (14 फेब्रवारी) शुक्रवारी रात्री बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एका कीर्तनाच्या दरम्यान इंदुरीकर महाराज बोलत होते. हा व्हिडिओ त्यांचे समर्थक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. इंदुरीकर महाराजांनी संपूर्ण वादात यू ट्यूब चॅनलवर आरोप लगावले आहेत. यू-ट्यूबवाले काड्या करतात. यू ट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे चॅनेल संपतील, मी नाही','यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकर संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयाप्रत आलोय. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. आता लय झालं. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली,' असं त्यांनी ठणकावून सांगितले आहे. यूट्यूबवाल्यांना इंदुरीकराच्या नावानं मोक्कार पैसा मिळाला. मी काय या यूट्यूबचा एक रुपयाही घेतला नाही असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी स्वतःवरील आरोप सुद्धा स्पष्ट केले, '26 वर्षे झाली. मला बायको नाही. पोरगं नाही. रात्रं-दिवस प्रवास, आणि कष्ट मी करतो, दोन-अडीच तासाच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतो. पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी हे भागवत, ज्ञानेश्वरीतही सांगितलंय. मी म्हणतोय ते खरंय असाही दावा इंदुरीकरांनी केला आहे.