Indurikar Maharaj | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या वाहनाला अपघात (Indurikar Maharaj Accident) झाला आहे. या अपघातातून ते बालंबाल बचावले. लाकडं वाहून नेणारी ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरला इंदुरीकर महाराज यांच्या कारची धडक झाल्याने हा अपघात (Accident) झाला. या अपघातात इंदुरीकर सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. प्राप्त माहितीनुसार, जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर (Partur) येथे बुधवारी (13 एप्रिल) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी निघाले असता ही घटना घडली.

परतूर येथील रस्त्याच्या एका वळणावर इंदुरीकर महाराज यांच्या वाहनाची आणि ट्रॅक्टरची धडक झाली. या अपघातात इंदुरीकर महाराज सुखरुप आहेत. तर त्यांच्या वाहनचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. वाहनाचे मात्र बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. ट्रॅक्टरचालक आणि इंदुरीकरांचा वाहन चालक अशा दोघांनीही एकाच वेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अप्रीय प्रसंग टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, Indurikar Maharaj on YouTubers: माझ्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील; इंदुरीकर महाराजांचा यूट्यूबर्संना शाप)

आपल्या विनोदी आणि मार्मिक शब्दफेकीमुळे तसे आपल्या खास शैलीमुळे इंदुरीकर महाराज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादही निर्माम झाले आहेत. खास करुन महिला संघटना आणि अंधश्रद्धा निर्मुलन संघटनांच्या रडारवर इंदुरीकर महाराज नेहमीच असतात. असे असले तरी काही वादग्रस्त बाबी वगळता इंदुरीकर महाराज ज्या पद्धतीने वास्तव दर्शन घडवतात तसेच, आयुष्याच्या मार्गावरुन तरुण वयात भरकटलेल्या तरुणांपासून ते लहान थोरांपर्यंत सर्वांनाच जे मार्गदर्शन करतात ते डोळ्यात अंजन घालणारे असते.