Yavatmal Floods (PC - Twitter)

Yavatmal Floods: पूर्व महाराष्ट्रातील यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील (Mahagaon Tehsil) एका गावात तब्बल 45 लोक अडकले असून राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) बचाव कार्यात गुंतले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. बचाव कार्यात भाग घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची (Indian Air Force) दोन हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचली आहेत, असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये सांगितले की, महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा गावात 45 लोक अडकून पडले आहेत.

नागपूरपासून सुमारे 150 किमी अंतरावर असलेल्या जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि लोकांना स्थलांतरित करावे लागले आहे. (हेही वाचा - Yavatmal Flood: पावसाचा कहर, यवतमाळ येथे 45 लोक पूरात अडकले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला मदतीचा हात)

दरम्यान, महागाव तहसीलमध्ये मध्यरात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत 231 मिमी पावसाची नोंद झाली, तर जिल्ह्यात 117.5 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. यवतमाळ शहरातील काही रस्तेही जलमय झाले असून बाधित भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

तथापी, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कासेरगाव गावातही सुमारे 140 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरने शनिवारी विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, अमरावती आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.