Income Tax Notice to Sharad Pawar: शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणूक शपथपत्रांसदर्भात मागितले विवरण
Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

महाविकासआघाडी (MVA) सरकार कोसळल्यानंतर घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाने (Income Tax department) नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी सन 2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये लढवलेल्या निवडणुकांमध्ये दिलेल्या निवडणूक शपथपत्रातील संपत्तीबाबत विवरण मागण्यात आले आहे. या निवडणुकांतील शपथपत्रात केलेल्या संपत्तीच्या उल्लेखाबाबत आयकर विभागाला पवापर यांची चौकशी करायची आहे. स्वत: शरद पवार यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. आयकर विभागाच्या नोटीसची शरद पवार यांनी प्रेमपत्र अशी संभावना केली आहे.

महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर शरद पवार यांनी नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्ती आहेत. जे मुख्यमंत्री झाल्यानंरतर उपमुक्यमंत्री झाले आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीस फार आनंदी दिसले नसल्याची टीकाही शरद पवार यांनी केली आहे. (हेही वाचा, Eknath Shinde cabinet Decision: एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील पहिलाच निर्णय, घ्या जाणून)

शरद पवार यांनी मोदीबाग येथील निवास्थानी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बोलताना पवार यांनी आयकर विभागाने पाठविलेल्या नोटीसांबाबत माहिती दिली. आपल्याला आयकर विभागाची प्रेमपत्रे आली असून, त्यांना मी 2004 पासून लढवलेल्या निवडणुकांमध्ये दिलेल्या शपथपत्रांबाबत चौकशी करायची असल्याचे पवार म्हणाले. विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन दबाव आणण्याचा हा प्रकार असल्याचेही शरद पवार म्हणाले.

ट्विट

शरद पवार यांनी म्हटले की, नव्या सरकारमध्ये आपल्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळेल याची अपेक्षा खुद्द एकनाथ शिंदे यांनीही केली नसेल. देवेंद्र फडणवीस यांनाही कल्पना नसेल की ते उपमुख्यमंत्रक्षी होतील. मात्र, भाजप हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेताना फारसा आनंद झालेला दिसला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जर निवडणुकांना सामोरे जात सत्ता मिळवली असती तर आपण त्यांना शबासकी दिली असती,असेही पवार म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेतील बंडाळीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, या बंडामुळे शिवसेना संपेल असे म्हणता येणार नाही. शिवसेनेला बंडं नवी नाहीत. याही आधी अनेक वेळा शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. विधिमंडळ पक्ष आणि संघटना ही वेगवेगळी असते. त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच राहील असेही शरद पवार यांनी आवर्जून सांगितले. भाजपने जो निर्णय आता घेतला तोच निर्णय जर निवडणूक 2019 नंतर लगेच घेतला असता तर, ही वेळच आली नसती असेही शरद पवार म्हणाले.