Ganpati Visarjan 2023: धक्कादायक! राज्यात गेल्या 24 तासांत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 12 जणांचा पाण्यात पडून मृत्यू, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक घटना

Ganpati Visarjan 2023: देशभरात गुरुवारी मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन करण्यात आलं. मात्र, अनेक ठिकाणी गणपती विसर्जनाला (Ganpati Visarjan) गालबोट लागल्याची घटना घटली आहे. गेल्या 24 तासांत राज्यभरात गणपती मूर्ती विसर्जनाच्या वेळी किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

गणेश चतुर्थीच्या 10 दिवसांच्या उत्सवाची सांगता होऊन अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गुरुवारी विसर्जनाला सुरुवात झाली. प्राप्त माहितीनुसार, नाशिकमध्ये पंचवटीमध्ये तीन आणि नाशिकरोड भागात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय साताऱ्यातील उंब्रज भागात, नांदेडमधील वजिराबाद आणि मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Pune: पुण्यात 5 वर्षाच्या मुलाचा टाकीत पडून मृत्यू, गणपती विसर्जन ठरला अखेरचा दिवस)

तथापी, रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण भागात अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने एक टेम्पो मूर्ती विसर्जन मिरवणुकीत घुसला. या अपघातात 17 वर्षीय तरुणी आणि टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Death Due To DJ: सांगलीत डॉल्बीच्या दणदणाटीमुळे आणखी एक मृत्यू? रस्त्यावर सापडला अज्ञात मृतदेह)

दरम्यान, गुरुवारी मुंबईक भव्य सोहळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या लालबाग परिसरात, तेजुकाया आणि गणेश गल्ली मंडळांकडून मूर्तींच्या मिरवणुकीला 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषाने सुरुवात झाली. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात सर्वाधिक भाविकांना आकर्षित करणाऱ्या प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मूर्तीची मिरवणूक सकाळी 11:30 च्या सुमारास सुरू झाली होती. याशिवाय, अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठाणे शहरात एकूण 6435 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.