Pune Rains Update: ताउक्ते चक्रीवादळानंतर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत तापमान कमी झाले असून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तर कोकणासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरीही बरसल्या. पुण्यातही गेल्या 2-3 दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. ढगांच्या गडगडाटासह पुण्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस (Pune Rains) पडत असून 5 जूनपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने (IMD) याबाबत माहिती दिली आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 30 मे रोजी शिवाजीनगर आणि लोहेगाव येथील तापमान अनुक्रमे 34.1 आणि 34.7 अंश सेल्सिअस इतके होते. TOI ने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता नसली तरीही मध्यम स्वरुपाचा पाऊस 5 जूनपर्यंत पाहायला मिळत आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Weather Updates: राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी 2 जून पर्यंत मान्सून पूर्व सरींनी महाराष्ट्र चिंब होण्याची शक्यता
ही परिस्थिती मध्यम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्यात पुढील काही दिवस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान मान्सून दाखल होण्यास अजून काहीसा अवधी असला तरी मुंबईत ढगाळ वातावरणासह मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाने त्रासलेल्या मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. सांताक्रूझ पश्चिमेकडील भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 31 मे पर्यंत मान्सून केरळ मध्ये दाखल होणार आहे तर 9,10 जून पर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होणार असल्याने आता राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पश्चिमेकडून पूर्व दिशेला वारा वाहण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे बाष्प जमा झाले आहे परिणामी महाराष्ट्र कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पुढील काही दिवस पाऊस पडू शकतो. 2 जून पर्यंत राज्यात सगळीकडे मान्सून पूर्व सरी बरसण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.