महाराष्ट्रात चक्रीवादळानंतर पुन्हा उकाडा वाढला होता पण आता मान्सून देशात दाखल होण्यास काधी दिवसांचाच अवधी उरला असल्याने महाराष्ट्रातील लोकांची उकाड्यापासून लवकरच सुटका होण्याची चिन्हं आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 31 मे पर्यंत मान्सून केरळ मध्ये दाखल होणार आहे तर 9,10 जून पर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होणार असल्याने आता राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पश्चिमेकडून पूर्व दिशेला वारा वाहण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे बाष्प जमा झाले आहे परिणामी महाराष्ट्र कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पुढील काही दिवस पाऊस पडू शकतो. 2 जून पर्यंत राज्यात सगळीकडे मान्सून पूर्व सरी बरसण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
पुण्यामध्ये काल सुमारे 3 तास मुसळधार पाऊस बरसला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस काल बरसला आहे. मुंबई, पुणे, रायगड, मराठवाडा, विदर्भ या भागात ढगाळ आकाश राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
KS Hosalikar Tweet
मुंबई, पुणे, रायगड ढगाळ आकाश, मराठवाडा, विदर्भ पण ☁☁☁
गेल्या 24 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार...
आजही ईशारे आहेत...IMD कडून pic.twitter.com/d5Oeb2ZhoN
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 30, 2021
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा सरासरीच्या 90% पाऊस देशात बरसणार आहे. त्यामुळे शेतकर्यांसाठी ही बाब दिलासादायक आहे. अनेकांनी आता खरीप हंगामाची तयारी केली आहे. मागील काही दिवसांत भारताने पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर प्रत्येकी एक चक्रीवादळ अनुभवलं आहे. पण त्याचा मान्सून विपरित परिणाम झालेला नाही. सध्याचे वातावरण पोषक असल्याचं हवामान खात्याने सांगितले असून केरळ मध्ये 31 मे आणि राज्यात 10 जून पर्यंत तो धडकणार असल्याचं चित्र आहे.